जळगावात चक्क गायीचे डोहाळे जेवण कार्यक्रम
By विलास बारी | Published: October 27, 2023 03:56 PM2023-10-27T15:56:20+5:302023-10-27T16:00:01+5:30
लक्ष्मी नगरातील रहिवासी गोसेवक दगडू व गणेश सपके यांच्या कडील ‘लक्ष्मी’ या गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम गुरुवारी उत्साहात पार पडला.
जळगाव - लक्ष्मी नगरातील रहिवासी गोसेवक दगडू व गणेश सपके यांच्या कडील ‘लक्ष्मी’ या गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम गुरुवारी उत्साहात पार पडला. सुरुवातीला विठ्ठल रखुमाई भजनी मंडळाच्या वतीने ज्योती नारखेडे व त्यांच्या सहकारी महिलांनी भजन, भक्तिगीते व गवळण सादर केली. यावेळी गायीचे तसेच गोमुत्राचे महत्त्व व उपयुक्तता पटवून दिले.
त्यानंतर जयवंताबाई सपके, सुनंदा सपके, मनिषा सपके यांनी गोमातेचे औक्षण करून खण व नारळाने ओटी भरली. त्यानंतर स्थानिक व आजूबाजूच्या परिसरातून आलेल्या महिलांनी गोमातेचे पूजन केले. यावेळी ओटी भरण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. याप्रसंगी महिलेच्या डोहाळे जेवणा प्रमाणेच गाईसमोर पेढे व जिलेबी ठेवण्यात आली. गायीने जिलेबीचा घास ग्रहण केल्यानंतर उपस्थित महिलांनी एकच जल्लोष केला. परीट समाजाचे सुरेश ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, नगरसेविका रेश्मा काळे, सागर सपके, पंकज शिरसाळे, जयेश सोनवणे, जगन्नाथ जाधव, अरुण राऊत यांच्यासह परीट समाज कार्यकर्ते, परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी नागरिकांनी भोजनाचा लाभ घेतला.