5 % GST ला विरोध, जळगावात एकाच दिवसात 70 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 05:19 PM2022-07-16T17:19:51+5:302022-07-16T17:29:18+5:30
नॉन ब्रँडेड धान्यावरील जीएसटीला वाढता विरोध : दाणाबाजार, बाजार समितीमध्ये शुकशुकाट, दालमिलची चाके थांबली
विजयकुमार सैतवाल
जळगाव : नॉन ब्रँडेड धान्यावर पाच टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) लावण्याच्या निर्णयाविरुद्ध शनिवार, १६ जुलै रोजी जळगावातील दाणाबाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच दालमिल बंद ठेवून केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. यामुळे जळगावात एकाच दिवसात ७० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. या बंदमुळे दाणाबाजार, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुकशुकाट होता तर दालमिलची चाकेदेखील थांबली होती.
नॉन ब्रँडेड धान्य, डाळी तसेच इतर खाद्यान्न वस्तूंवर पाच टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय जीएसटी कौन्सिलमध्ये घेण्यात आला व त्याची अंमलबजावणी १८ जुलैपासून होणार असल्याने या निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. या निर्णयाचा मोठा परिणाम व्यापाऱ्यांसह शेतकरी आणि सामान्य नागरिकांवर होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी देशव्यापी बंद पुकारला असून त्यात जळगावातील दाणाबाजार, बाजार समिती बंद ठेवण्यासह दालमिल चालकांनीदेखील बंद पाळला.
एकाच दिवसात करोडो रुपयांचा फटका
जळगावातील दाणाबाजारातून केवळ जळगाव जिल्हाच नव्हे तर संपूर्ण खान्देश, विदर्भ व मराठवाड्यात येथून माल जातो. त्यामुळे दिवसभरात येथे करोडो रुपयांची उलाढाल होत असते. या शिवाय जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य बाजारातदेखील दररोज ठिकठिकाणाहून धान्य, कडधान्य, डाळींची आवक तसेच विक्री होत असते. मात्र शनिवारच्या बंदमुळे दोन्ही ठिकाणी व्यवहार न झाल्याने करोडो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले.
डाळींचे उत्पादन थांबले
जळगावातील दालमिलमध्ये मोठ्या प्रमाणात डाळींचे उत्पादन होऊन ती देशासह विदेशातही निर्यात होत असते. ७५ दालमिलच्या माध्यमातून दररोज जवळपास एक हजार टन डाळींचे उत्पादन येथे होत असते. मात्र शनिवारी दालमिल बंद ठेवण्यात आल्याने डाळींचे उत्पादन थांबले. त्यामुळे दाणाबाजार, बाजार समिती व दालमिलमधील पूर्ण उलाढाल ठप्प होऊन ७० करोड रुपयांचा फटका बसला.
१०० टक्के बंद
नॉन ब्रँडेड धान्य, डाळीवर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय म्हणजे व्यापारी, शेतकरी, सामान्य नागरिक यांना वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात पुकारण्यात आलेला बंद १०० टक्के यशस्वी झाल्याचेदेखील सांगण्यात आले. यामुळे करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून सरकारने याचा विचार करावा व आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम कोगटा, दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पागरिया, उपाध्यक्ष अशोक धूत, सचिव मुकेश लोटवला, जळगाव जिल्हा मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक राठी, शशिकांत बियाणी यांनी केली आहे.