जळगावमध्ये महिलांनी ग्रुपमध्ये ॲड केले अन् शेतकऱ्याने पावणेसहा लाख गमावले
By विजय.सैतवाल | Published: September 3, 2023 04:14 PM2023-09-03T16:14:03+5:302023-09-03T16:14:40+5:30
शेतकऱ्याची पाच लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी २ सप्टेंबर रोजी सायबर पोलिस ठाण्यात लक्ष्मी व संजना नामक दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव : व्हॉटस्ॲप ग्रुप तयार करीत त्याद्वारे एका योजनेत गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा देण्याचे आमिष दाखवत कांचनकुमार सुधाकर पिंपळे (४७, रा. भालोद, ता. यावल) या शेतकऱ्याची पाच लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी २ सप्टेंबर रोजी सायबर पोलिस ठाण्यात लक्ष्मी व संजना नामक दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
एप्रिल २०२३ मध्ये लक्ष्मी व संजना नामक दोन महिलांनी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला व त्यात भालोद येथील शेतकरी कांचनकुमार पिंपळे यांना समाविष्ट केले. त्यावर दोन क्रमांकाद्वारे एक गुंतवणूक योजना सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. या योजनेत गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा देतो, असे त्यांना सांगण्यात आले. त्यासाठी या दोन महिलांनी पिंपळे यांच्या बँक खात्यातून वेळोवेळी एकूण सहा लाख ३० हजार रुपये दोन वेगवेगळ्या बँक खात्यांवर स्वीकारले.
गुंतविले सहा लाखांपेक्षा जास्त, मिळाले केवळ ६५ हजार
गुंतवणूक योजनेत सांगितल्याप्रमाणे पिंपळे यांना रक्कम दिलीच नाही. त्यांनी सहा लाख ३० हजार रुपये दिले असताना त्यांना केवळ ६५ हजार रुपये परत दिले. अनेक दिवस उलटले तरी उर्वरित नफा व मुद्दलही मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पिंपळे यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी.डी. जगताप करीत आहेत.