हृदयद्रावक! १० वर्षीय मुलाच्या डोळ्यासमोरच वडिलांची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

By विलास.बारी | Published: June 15, 2023 10:34 PM2023-06-15T22:34:30+5:302023-06-15T22:35:14+5:30

ममुराबाद शिवारातील घटना : ६ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर काढला मृतदेह

In Jalgoan, Father commits suicide by jumping into a well in front of his 10-year-old son | हृदयद्रावक! १० वर्षीय मुलाच्या डोळ्यासमोरच वडिलांची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

हृदयद्रावक! १० वर्षीय मुलाच्या डोळ्यासमोरच वडिलांची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

googlenewsNext

जळगाव : तालुक्यातील ममुराबाद शिवारातील म्हाळसा देवी मंदिराजवळील विहिरीत १० वर्षांच्या मुलासमोरच पित्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी ९.३० वाजता घडली. वडील येतील या अपेक्षेने मुलगा विहिरीच्या ठिकाणी अर्धा तास उभा राहिला, मात्र वडील येत नसल्याने शेजारील शेतातील शेतकऱ्यांना मुलाने माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

समाधान भास्कर कुंभार (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. समाधान कुंभार हे ममुराबाद येथील पटेलवाडा परिसरात पत्नी ज्योती, मुलगा वैभव व मुलगी राणी सोबत वास्तव्याला होते. समाधान कुंभार हे ममुराबाद शिवारात वीटभट्टीचा व्यवसाय करत होते. अनेक वर्षांपासून ते हा व्यवसाय करत होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून, तालुका पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, विकास शिंदे हे पुढील तपास करत आहेत.

विटांची ट्रीप टाकून मारली विहिरीत उडी

ममुराबाद शिवारातील वीटभट्टीवर जाऊन समाधान कुंभार यांनी जळगाव येथील एका बांधकामाच्या ठिकाणी विटांची ट्रीप खाली केली. तेव्हा समाधान यांनी मुलगा वैभवला सोबत घेतले. जळगावमध्ये विटांची ट्रीप टाकून आल्यानंतर समाधान यांनी ट्रॅक्टर ममुराबाद शिवारातील म्हाळसादेवी मंदिराकडे असलेल्या विहिरीकडे नेले. त्या ठिकाणी मुलाला ट्रॅक्टरवरच बसण्यास सांगून काही मिनिटात येतो असे सांगितले. मात्र, समाधान कुंभार यांनी काही पावले चालत जाऊन, मुलासमोर विहिरीत उडी घेतली. या घटनेने मुलगा भांबावला, काही वेळ थांबल्यानंतर मुलाने शेजारी असलेल्या शेतकऱ्यांना माहिती दिल्यानंतर शेतकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

सहा तासांच्या प्रयत्नानंतर आढळला मृतदेह

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिस स्टेशनचे विकास शिंदे, माणिक सपकाळे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी गावातील पट्टीच्या पोहणाऱ्यांना आणले. त्यानंतर विहिरीतून मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, विहिरीत पाणी भरपूर असल्याने सहा तासांचे प्रयत्न करूनही मृतदेह हाती लागत नव्हता. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास विहिरीत मृतदेह आढळला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. रात्री, उशिरा समाधान कुंभार यांच्यावर ममुराबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: In Jalgoan, Father commits suicide by jumping into a well in front of his 10-year-old son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.