धक्कादायक घटना! चिमुकला पाणी प्यायला गेला अन् तिथे चुलत भावाचा मृतदेह दिसला
By विजय.सैतवाल | Published: October 6, 2023 02:33 PM2023-10-06T14:33:29+5:302023-10-06T14:33:37+5:30
वडील उत्तरप्रदेशात आणि आई शेतात कामाला गेली असताना तरुणाची आत्महत्या
जळगाव - स्वयंपाकी असलेले वडील उत्तरप्रदेशात व आई शेतात कामाला गेलेली असताना लोकेश विलास अत्तरदे (२३, रा. विठ्ठलपेठ) या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवार, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास १० वर्षीय चिमुकला घरात पाणी पिण्यासाठी गेला त्या वेळी त्याला चुलत भाऊ गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला व ही घटना उघडकीस आली.
लोकेश याचे शिक्षण झाल्यानंतर तो कंपनीत काम करीत होता. त्याची आई शेती काम करते, बहीणीचे लग्न झाले असून वडील विलास अत्तरदे हे स्वयंपाकी आहे. ते उत्तरप्रदेशात लखनौ येथे स्वयंपाकी कामासाठी गेलेले आहे. शुक्रवारी सकाळी लोकेशची आई शेतात गेली होती. त्या मुळे तो घरात एकटाच होता. त्या वेळी त्याने घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास या तरुणाचा १० वर्षीय चुलत भाऊ घरात लोकेशकडे पाणी मागण्यासाठी गेला त्या वेळी त्याला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याला पाहताच चिमुकल्याने शेजारच्या मंडळींना ही घटना सांगितली. शेजारील काही तरुणांनी लोकेशला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
वडील येण्याची प्रतीक्षा
या घटनेविषयी नातेवाईकांनी लोकेशच्या वडिलांना माहिती दिली. ते लखनौ येथून आल्यानंतर शनिवारी मयताचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. लोकेशला एक बहीण असून तिचे लग्न झाले आहे. एकुलत्या एक मुलाने टोकाचा निर्णय घेत जीवन संपविल्याने अत्तरदे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.