नशिराबाद येथे दोन गटात तुफान हाणामारी; भावांवर चाकू, विळ्याने वार
By सागर दुबे | Published: April 11, 2023 03:21 PM2023-04-11T15:21:22+5:302023-04-11T15:21:49+5:30
परस्परांविरूध्द गुन्हा दाखल
सागर दुबे, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: तालुक्यातील नशिराबाद येथे दोन गटात तुफान हाणामारी झाली. ही घटना रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. या हाणामारीमध्ये तीन जण जखमी झाले असून त्यातील एकावर चाकू आणि विळ्याने वार झाले आहे. दरम्यान, पोलिस वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने वाद नियंत्रणात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात परस्परविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर दिलीप नाथ (२३, रा. पेठ, नशिराबाद) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री १० वाजता नाथ हे त्यांच्या घराच्या ओट्यावर बसून इतरांशी गप्पा मारत होते. एक व्यक्ती त्यांच्या घराजवळून जात असताना त्याला ज्ञानेश्वर नाथ हा आपल्याला पाहून हसत असल्याचा राग आला. त्याने नाथ यांना शिवीगाळ करून लोखंडी रॉड डोक्यात मारला. त्यानंतर त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी नाथ यांना मारहाण करून त्यांच्यावर विळ्याने वार केला. यात त्यांना हनुवटीवर दुखापत झाली. तर भांडण सोडविण्यासाठी नाथ यांचा भाऊ कमलेश हा आला असता, त्याच्या पाठीवर एकाने चाकूने वार केला. यात कमलेश हा गंभीर जखमी झाला. लागलीच नाथ कुटूंबियांनी जखमी भावांना रूग्णालयात उपचारार्थ हलविले. सोमवारी तक्रार दिल्यानंतर सहा जणांविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शिवीगाळ का करतोय म्हटले अन् माय-लेकास मारहाण
गणेश देविदास धनगर (२४, रा. पेठ, नशिराबाद) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास एक तरूण हा धनगर यांच्या घरासमोर येवून शिवीगाळ करत होता. गणेश धनगर यांच्या आईने घराबाहेर येवून घरासमोर शिवीगाळ का करतोय, अशी त्या तरूणाला विचारणा केली. याचा राग येवून त्याने त्यांना मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी गणेश हा आला असता, त्याला देखील त्या तरूणासह त्याच्या साथीदारांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. दरम्यान, सोमवारी धनगर यांच्या तक्रारीवरून चार जणांविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.