दोन दिवसांत सोने ९०० तर, चांदी तीन हजारांनी उतरली; सोने ७३ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर!
By विजय.सैतवाल | Published: July 20, 2024 05:32 PM2024-07-20T17:32:43+5:302024-07-20T17:33:38+5:30
गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात सातत्याने घसरण
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: गेल्या काही दिवसांपासून ९३ हजार रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात घसरण होत असून या दोन दिवसात ती तीन हजार रुपयांनी घसरली आहे. शुक्रवारी ९१ हजार रुपयांवर आल्यानंतर शनिवारी पुन्हा चांदीत एक हजार रुपयांची घसरण झाली व ती ९० हजार रुपये प्रति किलोवर आली आहे. दुसरीकडे सोन्याच्याही भावात दोन दिवसात ९०० रुपयांची घसरण होऊन ते शनिवारी ७३ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे.
गेल्या १० दिवसांपासून चांदी ९२ ते ९३ हजार रुपयांदरम्यान राहत आहे. गुरुवारपर्यंत ९३ हजारांवर असलेल्या चांदीच्या भावात शुक्रवारी (१९ जुलै) दोन हजार रुपयांची घसरण झाली व ती ९१ हजार रुपयांवर आली. त्यानंतर शनिवारी पुन्हा एक हजार रुपयांची घसरण होऊन चांदी ९० हजार रुपये प्रति किलोवर आली आहे. १७ दिवसातील हे कमी भाव असून या पूर्वी ३ जुलै रोजी चांदी ९० हजारांवर होती.
दुसरीकडे गुरुवारी (१८ जुलै) ७४ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचलेल्या सोन्याच्या भावात शुक्रवारी (१९ जुलै) ७०० रुपयांची तर शनिवारी पुन्हा २०० रुपये अशी दोन दिवसात एकूण ९०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने ७३ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे.