पारोळा बाजार समितीत १०० बेडच्या कोविड सेंटरचे उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 09:05 PM2021-05-03T21:05:49+5:302021-05-03T21:06:35+5:30
पारोळा येथे महिनाभरात ऑक्सिजन प्लांट सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चव्हाण यांनी दिली.
रावसाहेब भोसले
पारोळा : जळगाव जिल्ह्यासाठी रेमडेसिविर २५ हजार इंजेक्शन व २० हजार लसींचा डोस दोन दिवसात उपलब्ध होणार आहे. तसेच पारोळा येथे कुटीर रुग्णालयात एक ते दीड महिन्याच्या आत ऑक्सिजन प्लांट उभा राहणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजी चव्हाण यांनी दिली.
पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० बेडच्या कोविड केयर सेन्टरच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी सभापती अमोल पाटील, शेतकी संघाचे माजी अध्यक्ष चतुर पाटील, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अनिल गवांदे, गटविकास अधिकारी एन.आर.पाटील, मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील, पोलीस निरीक्षक संतोष भंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० बेडमध्ये २५ ऑक्सिबेड व ७५ नॉन ऑक्सिबेडचे हे कोविड केयर सेन्टर राहणार आहे. या ठिकाणी औषधी, ऑक्सिजन सिलेंडर व पारोळा येथील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, नर्स हे वैद्यकीय सेवेसाठी पुरविले जातील. डॉक्टर, परिचारिका यांच्या नियुक्तीचे नियोजन करून त्याप्रमाणे आदेश त्यांना देण्यात येतील, असे डॉ.चव्हाण यांनी सांगितले. या कोविड सेन्टरसाठी तत्काळ १० ऑक्सिसिलेंडर त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल जळगाव येथून उपलब्ध करून दिलेत.
तसेच शासनाकडून ज्याप्रमाणे रेमडेसिविर, लसी व औषधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्याप्रमाणे खाली कुटीर रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरविली जातात. गेल्या ५ ते ६ दिवसांपासून साठा शिल्लक नाही. पण दोन दिवसात जिल्ह्यासाठी २५ हजार रेमडेसिविर इंजेक्शन, २० हजार लसी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता सर्व ठिकाणी मुबलक इंजेक्शन लसी उपलब्ध करून देऊ, असे सांगितले.
पारोळा कुटीर रुग्णालयात एक दीड महिन्यात ऑक्सिजन प्लांटची उभारणी होणार आहे. दररोज १०० सिलिंडर एवढे ऑक्सिजनची निर्मिती या प्लांटमधून होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीत कोविड सेन्टर सुरू झाल्याने गरीब, गरजू रुग्णांना याचा मोठा फायदा होईल, असे यावेळी त्यांनी बोलून दाखविले.