बोंडअळी नियंत्रण जनजागृती चित्ररथाचे सदाभाऊ खोत यांच्याहस्ते उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 01:43 PM2018-08-15T13:43:39+5:302018-08-15T13:44:12+5:30
कृषी विभाग व कावेरी सिड्स यांच्या संयुक्त विद्ममाने कापूस पिकावरील गुलाबी व शेंदरी बोंड अळीच्या निवारण व नियंत्रणासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे.
जळगाव - कृषी विभाग व कावेरी सिड्स यांच्या संयुक्त विद्ममाने कापूस पिकावरील गुलाबी व शेंदरी बोंड अळीच्या निवारण व नियंत्रणासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या जनजागृती रथाचा शुभारंभ राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. तत्पूर्वी 72 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात खोत यांच्याहस्ते करण्यात आले.
जिल्ह्यात गतवर्षी कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात गुलाबी व शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. यावर आतापासूनच नियंत्रण यावे याकरीता कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असून या चित्ररथाचे उद्घाटन येथील कृषी विभाग कार्यालयाच्या आवारात आज ना. खोत यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, महापालिका आयुक्त् चंद्रकांत डांगे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, उपविभागीय कृषि अधिकारी गोरख लोखंडे यांचेसह कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व विविध बी बीयाणे उत्पादक कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी ना. खोत यांनी जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयास भेट दिली. याप्रंसगी कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी ना. खोत यांना चालू खरीप हंगामात जिल्ह्यातील पीकांची सद्यपरिस्थिती तसेच उपलब्ध खते, बी बीयाणे व इतर बाबींची माहिती दिली. तसेच ना. खोत यांच्या हस्ते जिल्ह्यातील निवडक शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचून या योजनांचा लाभ नागरीकांना मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन ना. सदाभाऊ खोत यांनी केले.