विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी समान संधी केंद्राचे उद्धाटन
By अमित महाबळ | Published: June 13, 2023 09:34 PM2023-06-13T21:34:08+5:302023-06-13T21:38:10+5:30
विद्यापीठात स्थापन झालेल्या समान संधी केंद्रात प्रा. राकेश रामटेके हे समन्वयक आहेत.
जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेत समान संधी केंद्राचे उद्धाटन मंगळवारी, राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
नाशिक येथील प्रादेशिक सहसंचालक भगवान वीर, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी उपायुक्त राकेश महाजन, विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील, समाजकल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील, संगणकशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. एस. आर. कोल्हे, केंद्राचे समन्वयक प्रा. राकेश रामटेके उपस्थित होते.
डॉ. नारनवरे यांनी सांगितले की, या समान संधी केंद्राच्या माध्यमातून शिक्षण संस्था व सरकार यांनी मिळून कार्य केल्यास विद्यार्थ्यांना विविध योजना व संधीची माहिती होऊन रोजगारसक्षम तरुण निर्माण होतील व एक नवीन राष्ट्र निर्माण करता येईल. सूत्रसंचालन डॉ.दीपक सोनवणे यांनी केले. ए. आर. काझी यांच्यासह प्रशाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
केंद्रात एक समन्वयक, १२ स्वयंसेवक
विद्यापीठात स्थापन झालेल्या समान संधी केंद्रात प्रा. राकेश रामटेके हे समन्वयक आहेत. या केंद्रात १२ विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करतील. हे विद्यार्थी कनिष्ठ विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्व योजनांची माहिती देतील. शिष्यवृत्ती अर्ज भरणे, मुदतीत अर्जांवर कार्यवाही करुन घेणे इ. कार्यवाही मुदतीत केल्याने शासनाकडून मार्च अखेरीस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. प्रशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी प्रशाळेतच सोडविल्या जाव्यात, असे अपेक्षित आहे.
जात प्रमाणपत्राबाबत महत्वाचे निर्देश
'शासन आपल्या दारी' हा उपक्रमात समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी महाविद्यालयात जाऊन जात प्रमाणपत्र तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी व्यापक मोहीम राबवण्याचे निर्देश डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले. मूळजी जेठा महाविद्यालयात समाज कल्याण विभागाच्या वतीने नाशिक विभागातील सर्व अधिकाऱ्यांची विभागीय बैठक झाली. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गुलाबराव खरात, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी भाऊ खरे, सहाय्यक आयुक्त नंदुरबार देविदास नांदगावकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रामसिंग आदी उपस्थित होते.