चाळीसगावात ‘वनस्पती उद्याना’चे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 01:08 AM2018-10-28T01:08:21+5:302018-10-28T01:09:27+5:30
चाळीसगाव शिक्षण संस्थेने एक पाऊल पुढे टाकून हे वनस्पती उद्यान (बॉटॅनिकल गार्डन) उभे करून चाळीसगावच्या वैभवात भर घालतानाच नवी ओळखही अधोरेखित केली आहे.
चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगावशिक्षण संस्थेने एक पाऊल पुढे टाकून हे वनस्पती उद्यान (बॉटॅनिकल गार्डन) उभे करून चाळीसगावच्या वैभवात भर घालतानाच नवी ओळखही अधोरेखित केली आहे. गणितीतज्ज्ञ भास्कराचार्याची कर्मभूमी असलेल्या या परिसराला पर्यावरणासह धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व आहे. तसेच या भागातील गौताळा अभयारण्य परिसरात अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. त्यामुळेच या उद्यानाचे महत्व आणखीनच वाढते. संस्थेचे सचिव डॉ. विनोद कोतकर यांचे उद्यानासाठीचे दातृत्वदेखील कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापिठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांनी येथे केले.
शनिवारी त्यांच्या हस्ते चाळीसगाव महाविद्यालयाच्या परिसरात साकारलेल्या डॉ. विनोद कोतकर वनस्पती उद्यानाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायणदास अग्रवाल यांच्यासह व्यासपीठावर संस्थाध्यक्ष बी. व्ही. चव्हाण, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, डॉ. एम. बी. पाटील, अॅड.प्रदीप अहिरराव, अशोक वाणी, क.मा. राजपूत, मु.रा.अमृतकार, राजेंद्र चौधरी, विश्वस्त बुदेलखंडी , अ.वि. येवले, माजी प्राचार्य डॉ.जी.पी. वाणी, प्रा. साहेबराव घोडे, प्राचार्य एस. आर. जाधव, प्राचार्य राहुल कुलकर्णी, डॉ.प्रकाश बाविस्कर, प्रा.डी.एन.उंदीरवाडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य एम.व्ही. बिल्दीकर यांनी केले.
दान नसून हे योगदान आहे
चाळीसगाव महाविद्यालयाचा माझ्या एकूणच जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. मी याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून वनस्पती उद्यान साकारण्यासाठी संस्थेला दान दिले नसून ही उतराई होण्यासाठी दिलेली योगदानाची अल्पशी ओंजळ आहे, अशा शब्दात वनस्पती उद्यान उभारण्यामागील आपली भूमिका डॉ. विनोद कोतकर यांनी उलगडली.