चाळीसगाव येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाचे उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 01:13 PM2018-08-26T13:13:57+5:302018-08-26T13:16:17+5:30
अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालय देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही
चाळीसगाव : चाळीसगाव येथील वकील बांधवांसह न्यायदान क्षेत्राला सशक्त वारसा आहे. ज्या प्रमाणे वरिष्ठ स्तर न्यायालय देण्यासाठी प्रयत्न केला, त्याचप्रमाणे अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी आवश्यक अटींची पूर्तता केल्यास यासाठीदेखील प्रयत्नशील राहिल, असे अश्वासित करुन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी न्यायदानाची प्रक्रिया जलद करण्यासाठी अवाहनही केले. रविवारी सकाळी न्यायमूर्ती गंगापूरवाला यांच्याहस्ते चाळीसगाव न्यायालयाच्या आवारात वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व चाळीसगावचे भूमीपुत्र संगीतराव पाटील यांच्यासह जिल्हा न्यायाधीश गोविंदा सानप, चाळीसगावच्या नूतन वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाचे प्रथम न्यायाधीश लक्ष्मीकांत पाढेन, चाळीसगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅड. राहुल पाटील आदी उपस्थित होते. यावेळी वकील संघासह, न्यायालयीन कर्मचारी व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना न्यायमूर्ती गंगापुरवाला म्हणाले, वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन झाल्याने संधी वाढणार आहे. येथील पक्षकार आणि वकिलवृंदास होणारा त्रासही थांबणार आहे. अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी आवश्यक जागा उपलब्ध करुन दिल्यास चाळीसगाव येथे ही देखील सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. त्यांनी मनोगतात न्यायदानाची प्रक्रिया गतीमान करण्यासह 'नो पेंन्डसी' हे तत्व पाळावे. अशी अपेक्षा व्यक्त केली.
आनंदाचा क्षण
चाळीसगाव येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय सुरु होणे हा आपल्यासाठी आनंदाचा क्षण असल्याची भावना न्यायमूर्ती संगीतराव पाटील यांनी व्यक्त केली. ३१ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर हे न्यायालय स्थापन होतेयं याचाही त्यांनी उल्लेख केला. उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटींची पुर्तता झाल्यामुळे न्यायालय स्थापन होऊ शकले हे खरेच. परंतू यासाठी आमदार म्हणून उन्मेष पाटील यांनी वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाच्या फाईलीला 'धक्का' देण्याचे काम केले आहे. पुढील काळात अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी आपण पाठपुरावा सुरुच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा न्यायाधीश गोविंदा सानप यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, जळगाव येथे दाखल असलेली एक हजार १५९ प्रकरणे आता चाळीसगाव येथे नव्याने सुरु झालेल्या वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात वर्ग झाली आहे. कृषि विभागाच्या ताब्यात असलेल्या गट क्र. २२२ एक व दोन मधील१० हेक्टर ८६ आर जागेपैकी न्यायालयासाठी तीन हेक्टर जागा मंजुर करावी. असा प्रस्ताव कृती समितीने बांधकाम विभागाकडे मार्च मध्ये दाखल केला आहे. जागा मिळाल्यानंतर न्यायालयाची इमारत व कर्मचारी निवासस्थाने बांधण्यात येतील. यासाठी आर्थिक तरतूद करणे शक्य होणार आहे.
प्रास्ताविकात अॅड. राहुल पाटील यांनी ३१ वषार्पासून सुरु असलेला पाठपुरावा विषद केला. यावेळी माजी मंत्री एम.के.अण्णा पाटील, आमदार उन्मेष पाटील, पं.स.सभापती स्मितल बोरसे, उदेसिंग पवार, प्रदीप देशमुख, प्रा. साहेबराव घोडे, उपसभापती संजय पाटील, प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार कैलास देवरे, जळगाव, पाचोरा, भुसावळ, भडगाव येथील वकील व सरकारी वकील व यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन चाळीसगाव न्यायालयाच्या न्यायाधीश अनिता गिरडकर यांनी केले. आभार जिल्हा न्यायाधीश लाडेकर यांनी मानले.