भुसावळात एकाच फलाटाचे दोन वेळा उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 04:40 PM2019-06-12T16:40:34+5:302019-06-12T16:42:06+5:30
भुसावळ रेल्वेस्थानकावर नवीन उभारणी करण्यात आलेल्या दोन नवीन (एकाच) फलाटांचे दोन वेळा उद्घाटन करण्याचा प्रकार घडला.
वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : येथील रेल्वेस्थानकावर नवीन उभारणी करण्यात आलेल्या दोन नवीन (एकाच) फलाटांचे दोन वेळा उद्घाटन करण्याचा प्रकार घडला. पहिल्यांदा तत्कालीन डीआरएम आर. के. यादव यांच्या हस्ते २४ एप्रिल रोजी, तर १२ जून रोजी खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते झाले.
गेल्या पाच वर्षांमध्ये भुसावळरेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा बदलला असून, अवघ्या काही दिवसातच नवीन फलाटांची उभारणी करण्यात आली आहे. फलाट क्रमांक एकवर २४ एप्रिल रोजी सकाळी ८.४५ वाजता गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ- सुरत पॅसेंजरला हिरवी झेंडी दाखवून तत्कालीन डीआरएम आर. के. यादव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते, तर १२ जून रोजी याच फलाटावरून गाडी क्रमांक १२५९८ गोरखपूर-मुंबई या गाडीला खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, एकाच फलाटाचे दोन वेळा उद्घाटन झाल्यामुळे शहरात दिवसभर चर्चा सुरू होती.
दरम्यान, फलाट क्रमांक एकवर नवीन उभारणी करण्यात आलेल्या फलाटांवर प्रवाशांसाठी शेड उभारणी, पाण्याची व्यवस्था गाड्यांच्या आगमनाचे इंडिकेटर्स, आधी सुविधा करण्यात आल्या.
नवीन फलाटमुळे २४ तास व्यस्त असलेल्या जुन्या फलाटवरील व प्रवासी गाड्यांची गर्दी कमी होईल व वारंवार बंद करण्यात येणाºया पॅसेंजर गाड्याही कायमस्वरूपी सुरू राहतील. अनेक वेळा फलाटांवर एक्सप्रेस गाड्या उभ्या असल्यामुळे पॅसेंजर गाड्या रद्द कराव्या लागत होत्या.
दरम्यान, तत्कालीन डीआरएम यादव यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर या फलाटावरून फक्त पॅसेंजर गाड्या जात होत्या व आता उद्घाटन झाल्यानंतर एक्सप्रेस गाड्याही जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कोच फॅक्टरी सहा नवीन गाड्यांसाठी प्रयत्न करणार- खासदार रक्षा खडसे.
गेल्या पाच वर्षात रेल्वे प्रशासनाकडे विविध विषय मार्गी लावण्यात यश मिळाले असून, यात अधिकाऱ्यांचाही मोलाचा वाटा आहे. कोच फॅक्टरीसह काही रखडलेले प्रकल्प पाठपुरावा करून मार्गी लावण्यात येतील. तसेच नवीन गाड्याही सुरू करण्यात येतील, अशी माहिती खासदार रक्षा खडसे यांनी फलाटाच्या उद्घाटनप्रसंगी दिली.
भुसावळ स्थानक देशांमध्ये मॉडेल स्थानक- आमदार सावकारे
पूर्वी भुसावळ रेल्वेस्थानक पाहिजे तशा सुविधा नव्हत्या. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये खासदार रक्षा खडसे व अधिकाºयांच्या सहकार्याने रेल्वेस्थानकाचा व परिसराचा संपूर्ण चेहरामोहरा बदलला आहे. देशातील मॉडल्स स्थानकांमध्ये भुसावळ स्थानकाचे नाव गणले जात जात आहे. तसेच स्थानकाच्या उत्तरेकडील व पश्चिमेकडील प्रवेशद्वारानजीक जिन्याजवळ, ज्याप्रमाणे संचलित जिने कार्यान्वित करण्यात आले त्याचप्रमाणे लिफ्टची सुविधाही करावी, अशी मागणीही यावेळी सावकारी यांनी केली.
याप्रसंगी डीआरएम विवेक कुमार गुप्ता, नगराध्यक्ष रमण भोळे, एडीआरएम मनोज सिन्हा, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा, वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक स्वप्नील नीला, उपमुख्य अभियंता (कार्य) रोहित थवरे, वरिष्ठ गृह आणि पर्यावरण प्रबंधक पी.रामचंद्रन, वरिष्ठ मंडळ विद्युत अभियंता जी.के.लखेरा, वरिष्ठ मंडळ विद्युत अभियंता जे.के.भंज, वरिष्ठ मंडळ विद्युत अभियंता प्रदीप ओक, वरिष्ठ मंडळ सरंक्षा अधिकारी एन.के. अग्रवाल, वरिष्ठ मंडळ विद्युत अभियंता दीपक कुमार, मंडल सुरक्षा उपायुक्त राजीव दीक्षित, मुख्य चिकित्सा अधीक्षक पी.के.सामंतराय, वरिष्ठ कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे, मंडल वाणिज्य प्रबंधक बी. अरूणकुमार, स्टेशन निर्देशक जी.आर.अय्यर, स्टेशन प्रबंधक मनोज श्रीवास्तव, प्रा.डॉ.सुनील नेवे, शेख शफी शेख अजिज, पालिका गटनेता मुन्ना तेली, उद्योगपती मनोज बियाणी, रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील, नगरसेवक प्रमोद नेमाडे, देवेंद्र वाणी, पोलीस निरीक्षक नायर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले उपस्थित होते.
.