यावल तालुक्यावर ‘प्रभारी राज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 04:08 PM2019-07-14T16:08:10+5:302019-07-14T16:10:24+5:30
यावल तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे व सर्वसामान्यांच्या विकासासाठी व सुरक्षेसाठी असलेले पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय, पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका येथे गेल्या अनेक वर्षांपासून ‘प्रभारी राज’ असल्याने तालुक्याचा विकास ठप्प झाला आहे.
डी.बी.पाटील
यावल, जि.जळगाव : यावल तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे व सर्वसामान्यांच्या विकासासाठी व सुरक्षेसाठी असलेले पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय, पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका येथे गेल्या अनेक वर्षांपासून ‘प्रभारी राज’ असल्याने तालुक्याचा विकास ठप्प झाला आहे.
यावल तालुका हा दोन विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. साहजिकच तालुक्यास दोन आमदार लाभले आहेत. दोन आमदार असताना तालुक्यातील या महत्त्वाच्या कार्यालयास कोणीही ‘वाली’ नसल्याने सर्वसामान्यांमध्ये प्रश्न उपस्थित केला जात आहे की, यास तालुकावासींची सहनशिलता कारणीभूत आहे की लोकप्रतिनिधींची उदासीनता?
ग्रामीण विकासाचे केंद्रबिंदू
ग्रामीण विकासाचे केंद्रबिंदू असलेले व मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या येथील पंचायत समितीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून गटविकास अधिकारी नाही. पंचायत समितीचे कामकाज सुरू दिसत असले तरी सक्षम अधिकारी नसल्याने ‘आव-जाव घर तुम्हारा है’ अशी गत आहे. यात मात्र ग्रामस्थांची हेळसांड होत आहे.
तालुका कृषी कार्यालय
येथील विरावली रस्त्यावरील शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुका कृषी कार्यालयाचे कामकाज तर ‘रामभरोसे’च सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून तालुका कृषी अधिकारी पद रिक्त आहे . दुय्यम अधिकारी म्हणून असलेल्या तीनही मंडळ अधिकारी पदांसह अनेक पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत.
कार्यालयातील सूत्रांनुसार, मंजूर विविध पदांपैकी ८० टक्के पदे रिक्त आहेत. शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील या कार्यालयात शेतकरी केव्हाही गेल्यास कार्यालयातील मोजके कर्मचारी सोडल्यास सर्व टेबल्स रिक्तच दिसतात. शेतकऱ्यांच्या विविध योजनांची माहिती मिळत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.
पोलीस ठाणे
गेल्या दीड महिन्यापासून येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.के. परदेशी यांची मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. दुय्यम अधिकारी सुजीत ठाकरे यांचीही गेल्या १५ दिवसांपासून बदली झालेली आहे. मात्र ‘प्रभारी अधिकारी’ नसल्याने ते थांबून आहेत. शहरासह हद्दीत अवैध व्यावसायिकांनी डोके वर काढले. स्थानिक पोलीस सर्व आॅलवेल सांगत असले तरी स्थानिक गुन्हे अन्वेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून मधून-मधून विविध ठिकाणी छापे, अवैध व्यावसायिकांवर मारले जातात. त्यामुळे स्थानिक पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ व्यवहार चालत असल्याचे नागरिकांत चर्चा आहे.
ग्रामीण रुग्णालय
येथील ग्रामीण रुग्णालय म्हणजे प्रथमोपचार केंद्र आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामीण रुग्णालस अधीक्षक लाभलेले नाहीत, तर वैद्यकीय अधिकाºयांची सर्वच पदे रिक्त आहेत. फिरत्या आरोग्य पथकाच्या डॉॅक्टरांकडून दररोज बाह्यरुग्ण तपासणी केली जाते. वेळेनंतर रुग्णांवर येथे केवळ प्रथमोपचार करून त्यांना जळगावला पाठवण्यात येते. ग्रामीण रुग्णालयाला अनेक वर्षांपासून स्थायी अधिकारी मिळू नये, यापेक्षा आणखी दुर्दैव कोणते असू शकते, असा प्रश्न यावल तालुकावासीयांमधून उपस्थित करण्यात येत आहे.
नगरपालिका
येथील नगरपालिकेचीही तीच गत आहे. गेल्या अडीच-तीन वर्षांपासून येथे मुख्याधिकारी नाही. रावेर पालिकेचे मुख्याधिकारी आर.एस.लांडे यांच्याकडे यावल पालिकेचा अतिरिक्त पदभार आहे. पालिकेला नियमित मुख्याधिकारी नसल्याने शहराचा विकास खुंटला आहे. नागरिकांची दैनंदिन कामे त्यामुळे खोळंबून पडत आहेत. परिणामी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शहरासह सर्व तालुकास्तरीय कार्यालयाचीच ही गत झाली आहे. सर्व कार्यालयांचे बाहेरील अधिकारीच ‘प्रभारी’ आहेत. बाहेरील तालुक्यास अधिकारी भेटतात. मग आपल्याच तालुक्यास का नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत यास तालुकावासीयांची सहनशिलता की लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत आहे, असा कोडे न उलगडणारा प्रश्न उपस्थित केला जात आहे.