जळगावात कोरोनानंतर म्युकोरमायकोसिसचे रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:15 AM2021-04-04T04:15:54+5:302021-04-04T04:15:54+5:30
लोकमत न्यूज नेटकर्व जळगाव : कोरोनातून बरे झाल्यानंतर जळगावात आता अनेक रुग्णांना म्युकोरमायकोसिस या जुन्याच मात्र नव्याने अधिक प्रमाणात ...
लोकमत न्यूज नेटकर्व
जळगाव : कोरोनातून बरे झाल्यानंतर जळगावात आता अनेक रुग्णांना म्युकोरमायकोसिस या जुन्याच मात्र नव्याने अधिक प्रमाणात समोर आलेला विकार जडला आहे. यात अनेक रुग्ण दृष्टी कमकुवत झाल्याच्या किंवा डोळ्यांखाली सूज, नाकाला सूज येत असल्याच्या तक्रारी घेऊन संबधित तज्ज्ञांकडे जात आहे. हे प्रमाण अधिक वाढल्याचे गंभीर चित्र आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. दुसऱ्या लाटेत संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. हा नवा स्ट्रेन असल्याचा अंदाज सर्वत्र वर्तविला जात आहे. मात्र, प्रयोगशाळेचे रिपोर्ट अद्याप समोर नाही. मात्र, एकत्रित नवीन लक्षणे, नवीन विकार संसर्गाचे वाढते प्रमाण यातून हा नवा स्ट्रेन असल्याचा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातून समोर येत आहेत. दरम्यान, त्यात आता कोरोनातून बरे झालेले अनेक रुग्ण नवीनच तक्रार घेऊन डॉक्टरकडे येत आहेत. याला म्युकोेरमायकोसिस संबोधले जात आहे. याचा धोका कमी करण्यासाठी डोळे, गाल आणि अनुनासिक अडथळा किंवा काळ्या कोरड्या कवचाची सूज आल्यावर अँटिफंगल औषधी त्वरित सुरू करावी. कोरोनामुळे प्रतिकार शक्ती कमी झाल्याने या फंगलचे संक्रमण वाढताना दिसून येत असल्याचे डॉक्टर सांगतात.
रोग कसा पसरतो
श्वासोच्छवास आणि त्वचेच्या माध्यमातून रोगजंतू शरीरात प्रवेश करतात आणि वेगवेगळ्या अवयवांचे नुकसान करतात. म्युकोरमायकोसिस मेंदू, नाक, सायनस म्हणजेच हवेच्या पोकळ्यांमध्ये वाढते. सुुरुवातीला हे लक्षात येत नाही. मात्र चेहरा, नाक, डोळ्याला हळूहळू सूज येताच या फंगल इन्फेक्शनचे तत्काळ निदान करून उपचार करणे गरजेचे आहे.
म्युकोरमायकोसिस नेमेके काय
म्युकोरमायकोसिस एक दुर्मीळ बुरशीजन्य संसर्ग आहे. याला झिगॉमायकोसिस देखील म्हणतात. यात रोग आणि जंतूंचा सामना करण्याची क्षमता कमी होते. तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, डोळ्याच्या बाजूला सूज येणे, डोकेदुखी, नाकाला सूज येणे, सायनस रक्तसंचय, अशी याची लक्षणे असल्याचे नेत्रतज्ज्ञ डॉ. धमेंद्र पाटील यांनी सांगितले.
कोट
अनेकांना या आजाराबद्दल माहिती नसल्याने रुग्ण उशिरा डॉक्टरांकडे जातात. तेव्हा वेळीच नजरेत आलेल्या या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आपल्या नेत्ररोग तज्ज्ञ आणि कान, नाक, घसा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कोविड १९ पासून मुक्त झाल्यावर नियमित व्यायाम, मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य औषोधपचार, सोबत सकस आहार घ्या.
डॉ. धर्मेंद्र पाटील, नेत्ररोगतज्ज्ञ