घरात लग्नाची बोलणी अन् बाहेर दोन मुले बेपत्ता झाल्याची जामनेरात घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 06:02 PM2018-01-17T18:02:59+5:302018-01-17T18:06:29+5:30
तीन तासांच्या शोधानंतर झाली बेपत्ता मुलांची व पालकांची भेट
आॅनलाईन लोकमत
जामनेर, दि.१७ : जळगाव तालुक्यातील रायपूर कंडारी येथील कुटुंबिय बुधवारी सकाळी दोन लहान मुलांसह जामनेर शहरातील घरकुल भागात लग्नाची बोलणी करण्यासाठी आले. घरात लग्नाची बोलणी सुरु असताना सोबत आलेले दोन लहान मुले बेपत्ता झाली. तीन तासांच्या शोधानंतर बेपत्ता मुले आढळून आल्याने मुलांची व पालकांची भेट झाली.
शेख भिकन शेख मन्सूर (रा.रायपूर कंडारी, ता.जळगाव) हे बुधवारी सकाळी नातेवाईक व दोघा लहान मुलांसोबत जामनेर शहरातील मुस्लीम वसाहतीतील घरकूलात राहणाºया एका व्यक्तीकडे लग्नाच्या बोलणीसाठी आले होते. घरात बोलणी सुरु असताना सोबत आलेले दोन्ही मुले घराबाहेर खेळण्यासाठी गेली. बराच वेळ झाल्यानंतरही ते दोन्ही घरात न आल्याने कुटुंबियांनी स्थानिक रहिवाशांसोबत मदनी नगर, बिस्मिल्ला नगर, जुना बोदवड रोड भागात शोध सुरु केला.
दोन्ही मुले गारखेडे येथील असल्याची माहिती काही वेळेनंतर मिळाली. याठिकाणी ही मुले एकटीच गावात फिरताना दिसल्याने त्यांना जामनेर पोलीस स्टेशनला आणले. बेपत्ता मुलांच्या कुटुंबियांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. दोघा मुलांना पाहून पालकांनी त्यांना मिठी मारली. दोघांनाही अश्रू अनावर झाले होते.
गारखेडा येथील गुलाब शहा, अरुण मिस्तरी, मिठाराम मोरे, संजय कोतवाल, शेख हरूण यांनी या मुलांची विचारपूस करून त्यांना जामनेरला आणले. शेख यांनी या सर्वांचे आभार मानले.
दरम्यान, या दोन्ही मुलांना दोन बुरखेधारी महिलांनी चॉकलेट देऊन नेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सहा वर्षीय मुलाने ‘लोकमत’ प्रतिनिधीजवळ दिली. गारखेडे येथे सोडून दोन्ही महिला एका मोटारसायकलस्वारासोबत गेल्याचे त्याने सांगितले.