उद्योजकाला मारहाण करीत 4 लाख लांबविले, जळगाव ‘एमआयडीसी’तील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:59 PM2017-12-21T12:59:09+5:302017-12-21T13:01:11+5:30
संशयित ‘हाडय़ा’ला अटक
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 21- शहरातील सुप्रिम कॉलनीतील घरुन कामगारांचे पगार अदा करण्यासाठी कंपनीत जात असताना उद्योजक मंगलसिंग दिवानसिंग पाटील (वय 52, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांना भर रस्त्यात अडवून दुचाकीवरुन आलेल्या एका चोरटय़ाने मारहाण केली आणि दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले चार लाख रुपये लांबविल्याची घटना मंगळवारी रात्री 9.30 वाजता एमआयडीसीतील बनवट इंडस्ट्री समोर घडली. याप्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मंगलसिंग पाटील यांनी तुषार पाटील यांच्या मालकीची डब्लु.सेक्टरमध्ये असलेली चटई कंपनी भाडय़ाने चालवायला घेतली आहे. मुलगा पंकज व निलेश असे मिळून तिघे जण या कंपनीचे कामकाज पाहतात. या कंपनीत 30 मजूर कामाला असून दोन सत्रात कामकाज चालते. या कामगारांचे 15 ते 20 तारखेच्या दरम्यान पगार अदा केले जातात. या पगारासाठीच मंगलसिंग पाटील हे घरातील चार लाख रुपये घेऊन दुचाकीने (क्र.एम.एच.19 बी.ङोड.7700) रात्री कंपनीत जायला निघाले होते.
वळणावर दुचाकी आडवी लावून बुक्क्याने मारहाण
मंगलसिंग पाटील हे रेमंड चौकातून पुढे जात असताना बनवट इंडस्ट्री जवळ वळण घेत असताना मागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या जाड शरीरयष्टीच्या एका चोरटय़ाने पाटील यांच्या दुचाकीच्या समोर दुचाकी आडवी लावली व पाटील यांना खाली ओढून तोंडावर बुक्क्याने मारहाण केली. त्यात ते जमिनीवर कोसळले. त्याच वेळी चोरटय़ाने पटकन डिक्की ओढून चार लाख रुपये रोख व आधारकार्ड असलेली बॅग काढून पळ काढला.
सहा तासात अटक
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव यांनी उपनिरीक्षक रोहन खंडागळे, शरद भालेराव, सचिन मुंडे, विजय नेरकर, जितेंद्र राजपूत व गोविंदा पाटील यांचे एक पथक तयार केले. त्यानुसार या पथकाने राबविलेल्या मोहीमेत विकास राजू गुमाने उर्फ हाडय़ा (रा.कंजरवाडा, जळगाव) याला रात्री दहा वाजता याला शोधून काढून अटक केली. मोडस ऑपरेंडीवरुन हाडय़ा पोलिसांच्या हाती लागला.
आरडाओरड केला मात्र शुकशुकाट..
रात्रीची वेळ असल्याने यावेळी रस्त्यावर शुकशुकाट होता. त्यामुळे पाटील यांच्या मदतीला कोणीच आले नाही. त्यांनी आरडाओरडही केली, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. थोडय़ावेळाने शंकर मिस्तरी नावाचा एक व्यक्ती रस्त्याने येताना दिसला असता त्याला पाटील यांनी हकीकत सांगितली. मिस्तरी यांनी पाटील यांच्या दोन्ही मुलांना घटनेची माहिती दिली. त्यामुळे दोन्ही मुले व कंपनीतील रामसिंग पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन पाटील यांना दवाखान्यात दाखल केले. बुधवारी दुपारी त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.