लाॅकडाऊनमध्ये बंद कंपन्यांत चोरीच्या घटना वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:13 AM2021-06-04T04:13:19+5:302021-06-04T04:13:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लाॅकडाऊन काळात कंपन्या बंद असल्याची संधी साधून चोरीचे प्रमाण वाढले आहे. कंपन्यांमध्ये होत असलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लाॅकडाऊन काळात कंपन्या बंद असल्याची संधी साधून चोरीचे प्रमाण वाढले आहे. कंपन्यांमध्ये होत असलेल्या चोरीच्या तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप होत आहे. केवळ कागदावरच साधा अर्ज घेऊन उद्योजकांना माघारी फिरवले जात असल्याच्या तक्रारी आहेत.
लाॅकडाऊन काळात ९० टक्के कंपन्या बंद असताना लहान-मोठ्या चोरीचे सत्र सुरूच झाले. काही उद्योजकांनी पोलिसांना घटना कळविली तर काहींनी पोलिसांचा वाईट अनुभव बघता तक्रार देणे टाळले आहे. काहींनी तक्रार केली ती पोलिसांनी कागदावर अर्ज स्वरूपात घेतली. गुन्हा दाखल केलेला नाही. अर्जावरील तक्रारींचे पुढे काहीच झालेले नाही. विचारणा करणाऱ्या उद्योजकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
तक्रार अर्ज देऊन महिना झाला; ना गुन्हा दाखल झाला, ना चोरटे सापडले
लोकेश आनंदराव मराठे (रा. मेहरुण तलाव) यांची एमआयडीसीत सेक्टर डब्लू ६५ मध्ये चटई व दाणे बनविण्याची कंपनी आहे. या कंपनीत चोरट्यांनी कार्यालय फोडून १२ हजार ५०० रुपये रोख, संगणक व सीसीटीव्हीचा संपूर्ण सेट असा एकूण ९२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या चोरीची तक्रार मराठे यांनी ५ मे रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली आहे. अद्यापपर्यंत कोणताही तपास लागला नाही किंवा गुन्हा दाखल झालेला नाही. परिणामी चोरट्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. पोलिसांचे वाईट अनुभव पाहता अनेक उद्योजक तक्रार देणे टाळत आहेत.
कोट...
लाॅकडाऊन काळात कंपन्या बंद होत्या. तेव्हा किमान ५० ते ६० ठिकाणी चोऱ्या झालेल्या आहेत. काही ठिकाणी किरकोळ वस्तू गेल्या त्यामुळे मालकांनी तक्रारी दिलेल्या नाहीत. मी स्वतः दोन वेळा पोलीस ठाण्यात गेलो. मात्र करू, बघू असे उत्तर मिळाले. गुन्हाही दाखल झाला नाही आणि चोरट्यांचा शोध लागलेला नाही.
- आनंद मराठे, कंपनी मालक