खासगी प्रवासी बसेसही बंद असल्याने नागरिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:15 AM2021-05-22T04:15:47+5:302021-05-22T04:15:47+5:30
नवीन बसस्थानकातील कोरोना चाचणी केंद्र बंद जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी नवीन बसस्थानकात मनपातर्फे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी अँटिजन चाचणी ...
नवीन बसस्थानकातील कोरोना चाचणी केंद्र बंद
जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी नवीन बसस्थानकात मनपातर्फे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी अँटिजन चाचणी केंद्र केले होते. या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची चाचणी करण्यात येत होती. मात्र, आता संचारबंदीच्या कडक काळात बसेसला प्रवाशांचा अल्पप्रतिसाद मिळत असल्यामुळे मनपातर्फे बसस्थानकातील अँटिजन केंद्र तात्पुरते बंद करण्यात आले आहे. सेवा सुरू झाल्यानंतर पुन्हा हे केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
स्वच्छतागृह नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय
जळगाव : येतील पासपोर्ट पासपोर्ट कार्यालयात स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. तरी पासपोर्ट कार्यालय प्रशासनाने या समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
वीजजोडणीसाठी ऑनलाइनही अर्ज करता येणार
जळगाव : घरगुती, वाणिज्य, औद्योगिक तसेच कृषी अशा सर्व वर्गवारीतील ग्राहकांना नवीन वीजजोडणीच्या अर्जासाठी महावितरणच्या वेबसाइट किंवा मोबाइल ॲपवर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याप्रमाणे अर्ज प्राप्त झाल्यानंतर महावितरणकडून नवीन वीजजोडणी देण्याची अंतर्गत प्रक्रियादेखील ऑनलाइन करण्यात आली आहे. अर्ज केल्यापासून त्याची मंजुरीच्या प्रक्रियेतील स्थिती पाहण्यासाठी ग्राहकांना ऑनलाइनही पाहता येणार असल्याचे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.
पेन्शन अदालतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव : भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेंशन बाबतच्या तक्रारी सोडवण्यासाठी १५ जून रोजी ऑनलाइनपद्धतीने पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पेंशनधारकांनी आपल्या तक्रारींसाठी मंडल कार्मिक अधिकारी, भुसावळ यांच्याकडे पोस्टाने अर्ज करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच ई-मेलही पाठविण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच अर्जासोबत आपले नाव, पदनाम, भरती तारीख, आपल्या तक्रारीचे स्वरूप आदी माहिती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.