भुसावळातील बंद पथदिव्यांमुळे गैरसोय- शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 03:29 PM2021-02-02T15:29:27+5:302021-02-02T15:30:15+5:30
भुसावळातील बंद पथदिव्यांमुळे जनतेची गैरसोय होत आहे.
भुसावळ : शहरातील बंद असलेल्या पथदिव्यांमुळे जनतेची गैरसोय होते. हे पथदिवे सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
याबाबतचे निवेदन मंगळवारी पालिका प्रशासनाला देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, बाजारपेठ पोलीस स्टेशन ते नाहटा चौफुली दरम्यान रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. आधीच या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पथदिवे बंद असताना येथून वाहतूक करणे जिकिरीचे होते. जनतेवर अंधारात चाचपडत मार्ग काढण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. तरी येथील पथदिवे सुरू करावेत. कारण पथदिवे केवळ शोभेचे ठरत आहे़त. त्यामुळे येथील रहिवाशांना तब्बल चार वर्षापासून अंधाराचा सामना करावा लागत आहे. नपा प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन नागरिकांची समस्या सोडवावी व नागरिकांच्या जिवाशी होणारा खेळ कुठेतरी थांबवावा. तसेच वेळेत दुरुस्ती न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून दंड वसूल करावा या मागणीचे निवेदन शिवसेनेचे भुसावळ दक्षिण विभाग शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेला देण्यात आले.
याप्रसंगी माजी नगरसेवक दीपक धांडे, शहर संघटक योगेश बागुल, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील, महिला आघाडीच्या तालुका संघटिका भुराताई चव्हाण, भारती गोसावी, छाया बोंडे, युवा सेना शहरप्रमुख सूरज पाटील, उपशहर प्रमुख नबी पटेल, विक्की चव्हाण उपस्थित होते.
खासदार व आमदार यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत मिनी हायमाँस्ट पोल बसविण्यात आले आहे, मात्र त्यांच्या दुरुस्तीकडेही दुर्लक्ष केले जात आहे. अनेक पथदिवे फुटले असून अनेक खांबही गायब झाले आहेत.
पथदिवे बंद असल्याने त्यावर केलेलालाखोंचा खर्च वाया जात आहे. पथदिव्यांवर जनतेचा पैसा खर्च झाला आहे. त्यामुळे जनतेचा पैसा पाण्यात जात आहे. पथदिवे सुरू न झाल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.