ममुराबादला शेडअभावी स्मशानभूमीत गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:28 AM2021-02-06T04:28:35+5:302021-02-06T04:28:35+5:30

ममुराबाद‌ : अंत्यसंस्कारासाठी सोयीची जागा नसल्याने गावात मृतदेहांना उघड्यावरील अस्वच्छ ठिकाणी जागा मिळेल तिथे अंत्यसंस्कार केले जातात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ...

Inconvenience in Mamurabad cemetery due to lack of shed | ममुराबादला शेडअभावी स्मशानभूमीत गैरसोय

ममुराबादला शेडअभावी स्मशानभूमीत गैरसोय

Next

ममुराबाद‌ : अंत्यसंस्कारासाठी सोयीची जागा नसल्याने गावात मृतदेहांना उघड्यावरील अस्वच्छ ठिकाणी जागा मिळेल तिथे अंत्यसंस्कार केले जातात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

१५ हजारावर लोकसंख्या असलेल्या ममुराबाद गावासाठी ग्रामपंचायतीने कधीकाळी शेडचा निवारा असलेल्या स्मशानभूमीसाठी ठराविक ठिकाणी व्यवस्था केलेली होती. ब्रिटिश काळातील ती स्मशानभूमी नामशेष झाल्यापासून ग्रामस्थ उघड्यावर जागा मिळेल तिथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहेत. त्याकरिता बऱ्याच वेळा गावालगतची शेती, बखळ जागा, खळवाडी तसेच जळगाव- विदगाव रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेचा पर्याय निवडला जातो. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात उघड्यावर अंत्यसंस्कार आटोपताना फार कष्ट पडत नसले तरी पावसाळ्यात सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरल्यानंतर उघड्यावरील अंत्यसंस्काराला मर्यादा येतात. एकसारखा पाऊस सुरू असल्यास लाकडे ओली होत असल्याने मृतदेह जाळताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. मोठे रबरी टायर्स तसेच डिझेलचा वापरही केला जातो. पाऊस असल्यास अंत्ययात्रा थेट जळगाव शहरातील शिवाजीनगरच्या स्मशानभूमीत नेली जाते. गरीब असो की श्रीमंत सर्वांना आप्तेष्टांच्या मृतदेहाची अवहेलना सहन करावी लागते. काही वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी आव्हाणे रस्त्यालगत त्यांच्या निधीतून स्मशानभूमी बांधून दिली होती. मात्र, जागेची निवड चुकल्याने त्या ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास कोणीच तयार झाले नाही.

स्मशानभूमीसाठी भूसंपादनाची गरज

सरकारी अथवा खासगी जागा निश्चित नसल्याने आजतागायत ममुराबाद येथील स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. भविष्यातही त्यावर तोडगा निघण्याची शक्यता कमीच आहे. ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष बाब म्हणून भूसंपादनाचा प्रस्ताव दिल्यास जागेचा प्रश्न निकाली निघू शकतो. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज मात्र आहे.

Web Title: Inconvenience in Mamurabad cemetery due to lack of shed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.