मेमू ट्रेनच्या महिन्यातून दोनच फेऱ्यांमुळे प्रवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:16 AM2021-04-21T04:16:13+5:302021-04-21T04:16:13+5:30
भुसावळ ते पुणे : नियमित सेवा सुरू करण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भुसावळ रेल्वे प्रशासनाने ...
भुसावळ ते पुणे : नियमित सेवा सुरू करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भुसावळ रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या मेमू ट्रेनच्या महिन्यातून दोनचं फेऱ्या ठेवल्यामुळे प्रवाशांमधून रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी निर्माण होत आहे. आधीच पुणे मार्गावर कमी गाड्या असतांना, पुन्हा या गाडीच्या महिन्यातून दोनच फेऱ्या ठेवल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
रेल्वे प्रशासनाने गेल्या आठवड्यात प्रसिद्धी पत्रक काढून १५ व २९ एप्रिल रोजी भुसावळ ते पुणे दरम्यान मेमू ट्रेनच्या दोन फेऱ्या चालविण्याचे जाहीर केले. यातील पहिली फेरी नुकतीच १५ एप्रिल रोजी झाली असून, दुसरी फेरी आता २९ एप्रिल रोजी होणार आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने अचानक जाहीर केलेल्या गाडीमुळे अनेक प्रवाशांपर्यंत या गाडीची कुठलीही माहिती पोहचली नाही. त्यामुळे पहिल्याचं फेरीला या गाडीला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. संचारबंदी लागू झाली असल्यामुळे या गाडीला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मात्र, रेल्वे ही गाडी दररोज सुरू ठेवल्यावरचं प्रवाशांचा प्रतिसाद मिळणार असल्याने, रेल्वे प्रशासनाने ही गाडी दररोज पूर्वीच्या हुतात्मा एक्स्प्रेसच्या वेळापत्रका प्रमाणे सुरू ठेवण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
इन्फो :
दुसऱ्या फेरीलाही अल्प प्रतिसाद मिळणार
या गाडीची अनियमित फेरी,अनियमित वेळ आणि पंधरा दिवसातून एकदाच धावणार असल्यामुळे या मेमू ट्रेन दुसऱ्या फेरीलाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळणार असल्याचे प्रवाशांमधून बोलले जात आहे. रेल्वे प्रशासनाने ही गाडी प्रवाशांच्या सोयीसाठी नसून, त्यांच्याच सोयीसाठी केली आहे. मुंबई नंतर पुणे मार्गावर प्रवाशांची सर्वाधिक वर्दळ असल्याने,रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्र एक्स्प्रेस प्रमाणे ही गाडी नियमित सुरू ठेवण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
इन्फो :
पुण्यासाठी आधीच कमी गाड्या असतांना रेल्वे प्रशासनाने मेमू ट्रेन दररोज सुरु ठेवावी. प्रशासनाचे महिन्यातून फक्त दोनच दिवस चालविण्याचे नियोजन का आहे याचा उलगडा होत नाही. ही गाडी दररोज चालविली, तर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल.
नितीन सोनवणे, अध्यक्ष, चाळीसगाव रेल्वे प्रवाशी संघटना.