१० हजार रुग्णांची वाढ, अॅक्टिव्ह केसेस ५५०० नी वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:29 AM2021-03-13T04:29:27+5:302021-03-13T04:29:27+5:30
जळगाव : अनियंत्रित गर्दी, नियमांची पायमल्ली, प्रशासनाचे दुर्लक्ष अशा विविध कारणांनी कोरोनाचा जिल्ह्यात उद्रेक झाला आहे़ महिनाभरात जिल्ह्यात ...
जळगाव : अनियंत्रित गर्दी, नियमांची पायमल्ली, प्रशासनाचे दुर्लक्ष अशा विविध कारणांनी कोरोनाचा जिल्ह्यात उद्रेक झाला आहे़ महिनाभरात जिल्ह्यात १०,२४२ रुग्ण वाढले तर सक्रिय रुग्णांची संख्या ५,८८० ने वाढून ६,३४२ वर पोहोचली आहे. सर्वाधिक सक्रिय रुग्णांच्या संख्येत जळगाव जिल्हा देशात आठव्या क्रमांकावर आहे. गंभीर बाब म्हणजे यात नाशिक व औरंगाबाद हेदेखील जळगावच्या खाली आहेत़
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अत्यंत झपाट्याने वाढला आहे. रोजच्या अहवालांमध्ये बाधितांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. टेस्ट न करणारे अनेक ‘कोरोना बॉम्ब’ अद्यापही बाहेर आहेत, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कारण शहरातील बाधितांचे प्रमाण अत्यंत वेगाने वाढत आहे. महापालिकेच्या केंद्रावरील तपासणीत जवळपास चाळीस टक्के रुग्ण नियमित बाधित आढळून येत आहेत. अन्य ठिकाणापेक्षा जळगाव शहरात संसर्ग अगदी वेगाने वाढत आहे. कुटुंबेच्या कुटुंबे बाधित येण्याचे प्रमाण वाढले आहे. काही मोठे हॉटस्पॉट समोर येत आहेत. जिल्ह्यात मध्यंतरीच्या काळात देण्यात आलेली सूट यामुळे कोरोना आता अनियंत्रित झाल्याचे चित्र आहे़
महिनाभरातील वाढ
रुग्ण : १०,२४२
सक्रिय रुग्ण : ५,८८०
मृत्यू : ६३
शहरात : ४,२४४
सक्रिय रुग्ण : २,४३६
सक्रिय रुग्णांचे पाच मोठे तालुके
जळगाव : २,८२६
चोपडा : ७६०
चाळीसगाव : ४५९
भुसावळ : ४५७
जामनेर : ४२७
ही आहेत जळगावात रुग्ण वाढण्याची प्रमुख कारणे
१) विवाह सोहळे : विवाह सोहळ्यांमध्ये केवळ ५० जणांच्या उपस्थितीला मंजुरी होती. मात्र, या नियमांना हरताळ फासत थेट दोन ते तीन हजार वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत हे सोहळे पार पडल्याचे गंभीर चित्र मध्यंतरीच्या कालखंडात होते. याचा उद्रेक अखेर समोर आलाच़
२) सभा, मेळावे : राजकीय सभा, मेळाव्यांमध्ये नियमांचा फज्जा उडाला. याचे मोठे उदाहरण म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची परिवार संवाद यात्रा, यानंतर राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी बाधित आढळून आले होेते. या गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नव्हते. शासकीय कार्यालयांमध्येही बैठकांवर नियंत्रण नव्हते.
३) होम आयसोलेशन : सप्टेंबर ते जानेवारी या काळात अनेक कोविड केअर सेंटर बंद असल्याने रुग्णांना होम आयसोलेशनचा पर्याय होता. या काळात गांभीर्याने याचे नियंत्रण झाले नाही. रुग्णांचे व्यवस्थित मॉनिटरिंग झाले नाही. त्यांचा आढावा घेतला गेला नाही. ही अत्यंत गंभीर परिस्थिती होती. शिवाय होम आयसोलेशनमधील रुग्ण नियम पाळत नव्हते. त्यामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला. होम आयसोलेशनमधील रुग्ण किती बिनधास्त असतात याचे उदाहरण म्हणजे अयोध्या नगरातील एका कुटुंबातील एक बाधित व्यक्ती थेट मॉर्निंग वॉकला गेली होती.
४) लसीकरणाची संथ गती : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला जिल्ह्यात संथ गतीने सुरुवात झाली. अद्यापही अनेक कर्मचाऱ्यांना दुसरा डोस दिला गेलेला नाही, अशा स्थितीत सामान्यांचा नंबर कधी येणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्येष्ठांचे लसीकरण सुरू झाले आहे. त्यांचा प्रतिसाद चांगला असला तरी केंद्रांवरील गर्दी बघता आणखी केंद्रे असती तर अधिक जोरात ही मोहीम सुरू राहिली असती, असेही चित्र आहे.