खान्देशात बिबट्याच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:39 PM2018-06-29T12:39:42+5:302018-06-29T12:41:39+5:30
वनविभाग करतेय लपवाछपवी
जळगाव : जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यालगतच्या वनक्षेत्रात बिबट्यांचे मृत्यूचे प्रकार वाढले असून महिनाभरात चार घटना घडल्या असून त्यातील यावल व शिरपूर या दोन घटनांमध्ये बिबट्याची शिकार झाल्याचे उघड झाले आहे. मात्र यावलच्या घटनेतच गुन्हा दाखल झाला असून शिरपूरच्या घटनेत तर गुन्हा दाखल करण्याची देखील तसदी वनविभागाने घेतलेली नाही.
जामनेर तालुक्यातील लाढशिंगी शिवारात एका नाल्याच्या कडेला बुधवारी सायंकाळी एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या मृत्यूबाबत वनविभागाने अत्यंत गुप्तता पाळत गुरूवारी त्या बिबट्यावर अंत्यसंस्कार केले. हा बिबट्या वयोवृद्ध असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. मात्र यानिमित्ताने जिल्ह्यात किंबहुना खान्देशात बिबट्याची शिकार करण्याचे प्रकार वाढ झाल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महिनाभरात बिबट्याच्या मृत्यूच्या ४ घटना घडल्या. त्यातील दोन घटनांमध्ये बिबट्याची शिकार झाली आहे.
यावल वनक्षेत्रात बिबट्याचा मृत्यू झाला होता. या घटनेत बिबट्याने हल्ला केल्याने त्यास प्रतिकार करीत तडवी नामक युवकाने बिबट्यालाच दगडाने ठेचून ठार केल्याचा दावा केला होता. मात्र या युवकाने जबाब वारंवार बदलला. रस्त्याने जात असताना बिबट्याने हल्ला करीत हात धरल्याचे सांगितले. मात्र त्या युवकाच्या जखमांवरून त्यात तथ्य वाटत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच बिबट्याला दगडाने ठेचून मारल्याचा दावा युवकाने केला. मात्र बिबट्याच्या अंगावरील खुणा या कुºहाड अथवा त्यासारख्या तीक्ष्ण हत्याराच्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच या प्रकरणी अखेर त्या युवकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चौकशी यावल वनविभागाचे आरएफओ व्ही.एम. पाटील हे करीत आहेत. तर शिरपूर येथे दोन लोकांवर हल्ला केल्याने त्यांना वाचविण्यासाठी बिबट्याला बंदुकीने गोळी मारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र याप्रकरणी वनविभागाने गुन्हा देखील दाखल केला नाही.
बिबट्याचे शवविच्छेदन करुन अहवाल रवाना
मृत बिबट्याला अग्नीडाग देण्यात आला यावेळी सहाय्यक वनरक्षक एन. ए.पाटील, चाळीसगावचे वनक्षेत्रपाल संजय मोरे, जामनेरचे वनक्षेत्रपाल समाधान पाटील, धनंजय पवार, बळवंत पाटील, सुनील पवार, आर.एस.ठाकरे, विकास गायकवाड तसेच सरपंच जीवन उगले, पोलीस पाटील मिलिंद लोखंडे उपस्थित होते. जामनेरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत व्यवहारे, वाकोदचे डॉ.चंद्र्रकांत आव्हाळ, फत्तेपूरचे डॉ.राहुल ठाकूर यांनी बिबट्याचे शवविच्छेदन करून अहवाल तपासासाठी पाठविला.
तोंडापूर जवळील लाढशिंगी शिवारात नाल्याच्या कडेला बिबट्या मरून पडला होता. शेतकऱ्यांच्या ते निदर्शनास आल्याने वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी तेथे पाहणी केली. मी देखील स्वत: आज सकाळी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या बिबट्याचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. शवविच्छेदन अहवाल येणे बाकी आहे. मात्र हा बिबट्या वृद्ध झाल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
-डी.डब्ल्यू. पगार, उपवनसंरक्षक, जळगाव वनविभाग.
सायंकाळी घटनेची माहिती मिळाली. त्यामुळे घटनेचा माझ्यासमक्ष पंचनामा करण्यात आला.
-जीवन उगले, सरपंच, ढालसिंगी
शेतात काम करणाºया मजुरांनी बिबट्या दिसल्याची माहिती दिली. मी खात्री करून ही माहिती वनविभागाच्या अधिकाºयांंना कळविली.
-सचिन वसंत पाटील, शेतकरी, तोंडापूर