जळगावच्या बाजारपेठेत मागणी वाढल्याने डाळींमध्ये तेजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 12:53 PM2019-04-04T12:53:32+5:302019-04-04T12:54:16+5:30
विजयकुमार सैतवाल जळगाव : जळगावच्या बाजारपेठेमध्ये सर्वच डाळींना मागणी वाढत असल्याने व आवक कमी असल्याने त्यांच्या भावात प्रती क्विंटल ...
विजयकुमार सैतवाल
जळगाव : जळगावच्या बाजारपेठेमध्ये सर्वच डाळींना मागणी वाढत असल्याने व आवक कमी असल्याने त्यांच्या भावात प्रती क्विंटल ३०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या वर्षभरासाठीच्या धान्य खरेदीसह डाळींचीही मागणी वाढल्यामुळे डाळीत तेजी येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कमी पावसामुळे शेती मालाची आवक घटून सुरुवातीपासूनच त्यांचे भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. यात गेल्या वर्षी दिलासा दिलेल्या डाळींचे यंदा ग्राहकांसाठी चांगलेच डोकेदुखी ठरत आहे. दोन आठवड्यापूर्वी १०० रुपये प्रती क्विंटलने वाढ झालेले गहू या आठवड्यात स्थिर असून तांदळालादेखील मागणी असली तरी त्यांचेही भाव स्थिर असल्याने तेवढा ग्राहकांना दिलासा आहे.
यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून उत्पादन घटन्यासह दर्जावरही परिणाम झाला आहे. मुगाला शेवटच्या टप्प्यात आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने उडीद, मुगाचे उत्पादन कमी झाले. हा फटका अद्यापही कायम असून ऐन खरेदीच्या हंगामात त्याचा मोठी परिणाम जाणवून डाळींमध्ये आणखी तेजी येत असल्याची माहिती जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.
गेल्या आठवड्यात ६८०० ते ७२०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ७२०० ते ७६०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाच्या डाळीतही ३०० ते ४०० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन ती ५२०० ते ५५०० रुपयांवरून ५६०० ते ६००० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. गेल्या आठवड्यात ५३०० ते ५६०० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ५७०० ते ६००० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. तर तूरडाळदेखील ७३०० ते ७५०० रुपये प्रती क्विंटलवरून ७६०० ते ८००० रुपये प्रती क्विंटल झाली आहे.
गव्हाचे भाव स्थिर
अनेक ग्राहक आपल्या घरात वर्षभरासाठी धान्य साठवून ठेवतात. त्यामुळे दिवाळीनंतर आता पुन्हा उन्हाळ््याच्या काळात गव्हाला मागणी वाढल्याने गेल्या आठवड्यात गव्हाच्या भावात ५० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली होती. या आठवड्यात मात्र गव्हाचे भाव स्थिर आहे. दोन आठवड्यांपूर्वी २१५० ते २२५० रुपये प्रती क्विंटल असलेल्या १४७ गव्हाचे भाव २२०० ते २३०० रुपयावर पोहचले होते. अशाच प्रकारे लोकवन गव्हाचे भावदेखील २१५० ते २२५० रुपये प्रती क्विंटलवरून , शरबती गहू २५५० ते २६५० रुपयांवरून २२०० ते २३०० रुपयावर पोहचले होते. चंदोसीचे भाव ३१५० ते ३९५० रुपयांवरून ३२०० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले होते. या सोबतच शरबती गव्हाचे भाव २३५० ते २४५० रुपये प्रती क्विंटलवरून २४०० ते २५०० रुपये प्रती क्विंटल झाले होते. या आठवड्यात मात्र सर्वच प्रकारच्या गव्हाच्या भावात कोणतीही वाढ न होता गेल्या आठवड्याच्याच भावावर गहू स्थिर राहिले. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू आहे.
तांदुळाचे भाव स्थिर
तांदुळाची आवक नसली तरी त्याचे भाव गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. यात सुगंधी मसुरी २ हजार ७०० रुपये प्रती क्विंटल, चिनोर ३ हजार रुपये प्रती क्विंटल, कालीमूछ ४ हजार रुपये प्रती क्विंटल, लचकारी कोलम ४ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल, आंबेमोहर ५ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल, बासमती ९०० ते १ हजार ३०० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहेत.