भावा, दुचाकी चोरीचा भरोसा नाय; मग विमा का काढला जात नाय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 10:42 AM2022-03-15T10:42:55+5:302022-03-15T10:44:10+5:30

Jalgaon : चोरीच्या घटनांमध्ये वाढ, ८० टक्के दुचाकींचा विमाच नाही

Increase in theft cases, 80% of two-wheelers do not have insurance in Jalgaon | भावा, दुचाकी चोरीचा भरोसा नाय; मग विमा का काढला जात नाय?

भावा, दुचाकी चोरीचा भरोसा नाय; मग विमा का काढला जात नाय?

Next

जळगाव : एकीकडे दुचाकी चोरीच्या घटना वाढलेल्या असताना दुचाकींचा विमा काढणाऱ्यांची संख्या मात्र बोटावर मोजण्याइतकीच आहे. बाईक खरेदी करताना विमा काढला जातो तो पहिला आणि अखेरचा असतो. नंतर मात्र विमा काढण्याची तसदीच घेतली जात नाही. आरटीओच्या म्हणण्यानुसार शंभरात फक्त २० जण दुचाकीचा विमा काढतात, ८० जण विमाच काढत नसल्याची धक्कादायक माहिती आहे.

जळगाव जिल्ह्यात २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत १ हजार ८४४ दुचाकी चोरी झालेल्या आहेत तर त्यापैकी फक्त ५४१ दुचाकींचा शोध लागलेला आहे. १ हजार ३०३ दुचाकींचा अद्यापही शोध लागलेला नाही. पोलिसांकडून दुचाकी व चोरट्यांचा शोध सुरू आहे. चोरी झालेल्या १ हजार ८४४ पैकी फक्त २० टक्के दुचाकींचाच विमा होता, असेही निष्पन्न झालेले आहे.

दुचाकी चोरी
वर्ष -   चोरीस गेल्या -  शोधण्यात यश
२०२१ - ७५७         - २४८
२०२० - ६२०          - १६८
२०१९ - ४६७          - १२५

खरेदी करताना विमा पहिला अन् शेवटचा
बहुतांश मालक दुचाकी खरेदी केल्यानंतर दुसऱ्या वेळी विमा काढायचे नावच घेत नाही. सुरुवातीला कंपनीकडूनच पाच वर्षांचा विमा काढला जातो. नंतर पुढे मालकाला तो काढायचा असतो. अनेक मालकांनी खरेदी करतानाच जो विमा काढलेला असतो तोच शेवटचा असतो. नंतर विमा काढण्याची तसदीच घेतली जात नाही.

किंमत पण कमी नाय
दुचाकीच्या किमती आधी कमी होत्या. आता कुठलीही दुचाकी ५० ते ६० हजारांपासून सुरू होते. त्यामुळे ती चोरीस गेल्यास मोठा फटका बसतो. काही दुचाकींच्या किमती तर एक ते पाच लाखांपर्यंत आहेत. या महागड्या दुचाकीच चोरी होण्याचे प्रमाण अधिक आहे. अपघात असो किंवा चोरी अशावेळी विम्यामुळे मोठा दिलासा मिळतो.

दुचाकी चोरी गेल्यानंतर डोळे उघडते
वाहन कोणतेही असो त्याचा विमा काढणे कायद्याने सक्ती तर आहेच पण वैयक्तिक देखील फायदेशीरच आहे. दुचाकी चोरी गेली की तेव्हा त्याचे महत्त्व कळते. विमा काढलेला असला तर दुचाकी चोरी झाली तरी त्याची रक्कम मालकाला विमा कंपनीकडून मिळते.
-किशोर पाटील, विमा प्रतिनिधी

विम्याचे महत्त्व अजूनही लोकांना कळलेले नाही. सध्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे, चोरी गेलेले वाहन सापडलेच याची शाश्वती नाही. त्यामुळे विमा काढून दुचाकीचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. चोरी गेली तर कंपनीकडून मोबदला मिळतो.
- शिवाजी पाटील, विमा प्रतिनिधी

विम्याबाबत दुचाकीस्वार काय म्हणतात?
नियमित कामाच्या व्यापात दुचाकीच्या विम्याची मुदत कधी संपते, ते कळतही नाही. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होते. पेट्रोलचे वाढते दर, मजुरी कमी व घरखर्च याचा ताळमेळ बसवताना मोठी कसरत होते, म्हणून विमा काढायला टाळाटाळ होते.
-पुंडलिक संतोष पाटील, दुचाकीस्वार

इच्छा असूनही विमा काढला जात नाही. विम्याला एका वर्षासाठी दीड हजारापेक्षा जास्त रक्कम मोजावी लागते. दहा वर्षांत तर जुन्या दुचाकीच्या किमतीइतकीच रक्कम विम्याची होती. विमा काढणे फायदेशीरच आहे.
-मुकेश गंगाधर शिंदे, दुचाकीस्वार

शंभरात २० दुचाकींचाच विमा
दुचाकीचा विमा काढणाऱ्यांची संख्या फक्त २० टक्के इतकीच असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी ‘लोकमत’ ला दिली. नवीन दुचाकी घेताना सुरुवातीला पाच वर्षांचा विमा असतो, नंतर मात्र विमा काढण्याकडे मालकाकडून दुर्लक्ष होते. विमा नसला तरी दुचाकी हस्तांतर केली जात नाही.

Web Title: Increase in theft cases, 80% of two-wheelers do not have insurance in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.