रुग्णवाढीचा दर कमी करण्यासह लॅबची तपासणी क्षमता वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:30 AM2021-03-13T04:30:38+5:302021-03-13T04:30:38+5:30
जळगाव : कोरोना रुग्णवाढीचा दर जास्त असून तो कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी, तसेच नमुन्यांच्या तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय ...
जळगाव : कोरोना रुग्णवाढीचा दर जास्त असून तो कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी, तसेच नमुन्यांच्या तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील लॅबच्या तपासणीची क्षमता वाढवा, असे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी दिले.
राज्यासह जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव कुंटे यांनी जिल्हानिहाय विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख यांच्याशी संवाद साधून आढावा घेत आहे. त्यावेळी त्यांनी वरील निर्देश दिले.
तपासणी वाढवा
जळगाव जिल्ह्यामध्ये रुग्णवाढीचा दर २० टक्के झाला असून तो कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्य सचिव म्हणाले. यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकट सहवासीतांची तपासणी करण्याचे प्रमाण वाढवावे, यासोबतच इतरांच्याही चाचण्या करा, सर्व्हे करावा, दैनंदिन चाचण्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी जिल्ह्यांमध्ये असलेल्या सुविधांचे अद्ययावतीकरण करून घ्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
लॅबची क्षमता वाढवा
चाचण्या वाढविण्यासाठी लॅबची क्षमता वाढविण्याचीही गरज असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील लॅबच्या तपासणीची क्षमता वाढवा, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले. या लॅबची क्षमता दररोज एक हजार चाचण्यांची असून रुग्णांच्या तुलनेत तपासणी करायची झाल्यास ही क्षमता कमी ठरते. त्यामुळे या लॅबची क्षमता वाढविण्याचे निर्देश देण्यात आले.
नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा
कंटेन्मेंट झोनसाठी असलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ कार्यवाही सुरू करावी, असेही मुख्य सचिवांनी या वेळी सांगितले. शहरी भागात महापालिका आणि पोलीस प्रशासनाने समन्वयाने काम करून लोकांना कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन करतानाच नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा, ज्यांना गृहविलगीकरण करण्यात आले आहे त्यांचा यंत्रणेने दररोज आढावा घेऊन आरोग्यविषयक पाठपुरावा करावा, असेही या वेळी सांगण्यात आले.
मैदानात उतरून उपाययोजनांची अंमलबजावणी करा
कोरोना प्रतिबंध नियमांचे प्रभावीपणे पालन करण्यासाठी मी जबाबदार ही जनजागृती मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना देण्यात आल्या. विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देशही मुख्य सचिवांनी दिले. कोरोना प्रतिबंधाबाबत जिल्हा प्रशासनाला गेल्या वर्षभरापासूनचा अनुभव असून कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मैदानात उतरून उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहनही मुख्य सचिवांनी केले.