मन वढायं.. वढायं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 11:51 PM2018-12-02T23:51:23+5:302018-12-02T23:52:46+5:30
मानवी मन मोठं अथांग आहे. प्राचीन काळात या ऋषीमुनींपासून आजच्या मानसशास्त्रांपर्यंत सर्वांनीच आप-आपल्यापरीने मनाचं स्वरुप समजावून घेण्याचा, विशद करण्याचा ...
मानवी मन मोठं अथांग आहे. प्राचीन काळात या ऋषीमुनींपासून आजच्या मानसशास्त्रांपर्यंत सर्वांनीच आप-आपल्यापरीने मनाचं स्वरुप समजावून घेण्याचा, विशद करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही मनाचे नेमके स्वरुप कुणाला आकलन झालेले नाही. मनाला इंद्रियांचा राजा म्हणतात. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मोंद्रिये ही १० इंद्रिये ज्याच्या इशाऱ्यावर काम करतात ते मन हे अकरावे इंद्रिय मानले गेले आहे. इतर इंद्रियांना दृश्यरुप आहे. आकार आहे, ज्याचे त्याचे निश्चित असे स्थान आहे. पण आपल्या शरीरात मन नेमके कुठे ठेवले आहे? त्याचा आकार स्वरुप कसा आहे? संत ज्ञानेश्वर महाराज या मनाबद्दल निरुपण करताना म्हणतात ‘हे मन कैसे केवढे । पाहो म्हणो तरी न सापडे । परी राहाटावया धोकडे । त्रैलोक्य इया ।। ‘पाहू गेलो तर दिसत नाही. सर्वत्र फिरत मात्र असतं. त्याचा स्वभाव मात्र चंचल आहे. एका जागी स्थिर राहत नाही. एका विषयात रमत नाही. मन चपय चपय याची काय सांगू मात । आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभायात । असं त्याचं वर्णन बहिणाबाई करतात. इंद्रियांना विषयामागे धावायला मनच भाग पाडतं. मन कधी कृती करत मग शरीराकडून ती कृती पूर्ण होते. मनात सतत विविध संकल्प विकल्पाची उलथापालथ सुरू असते. म्हणूनच महर्षी पतंजलींनी ‘संकल्प विकल्पात्मक मन’ अशी मनाची व्याख्या केली आहे. तसे मन भोगत काहीच नाही. मानवी सुख-दुखाचे एकमेव कारण ही मनच आहे. मनके मारे हार है... मन के मारे जीत । मन ही मिलाय रामको मन करे फजित । असे मनाचे वर्णन कबीरांनी एका दोह्यात केलेले आहे. शास्त्रकारांनी माणसाच्या बंधमोक्षाचे कारण मनच आहे असे सांगितले आहे.
मन एवं मनुष्यवाणी कारण बंध मोक्षय ।। अशा या चंचल मनाला स्थिर कसे करता येईल? माकडाची कधी समाधी लागू शकेल काय? हे कैसे घडेल का मर्कट समाधी येईल? असा प्रश्न माऊली विचारतात. गीतेच्या सहाव्या अध्यायास अर्जूनाचा श्रीकृष्णाशी या विषयावर मोठा गोड संवाद झाला आहे. मन चंचल खरेच पण अभ्यास आणि वैराग्य या दोन साधनांनी ते निश्चित स्थिर होईल. काबूत येईल असे भगवंत सांगतात. मन एकदा स्थिर झाले की मग सुखाच्या कोठाराची चाबी सापडलीच समजा. संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।।
आज प्रत्येक जण ताण-तणावाखाली आहे. परंतु त्याकडे निकोप दृष्टीने पाहण्याची गरज आहे. मनाच्या स्वास्थासाठी ध्यानाचा उत्तम उपाय ऋषीमुनींनी सांगितला आणि नामस्मरणाचा सोपा मार्ग संतांनी सांगितला. एकदा नामाची गोडी लागली ती सुटत नाही. लाचावले मन लागली से गोडी । ते जीवे न सोडी ऐसे झाले । मग सर्व समस्या सुटत असतात.
-प्रा.सी.एच.पाटील, धरणगाव.