मनोबल वाढवा... आनंदी व्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 05:19 PM2018-12-24T17:19:32+5:302018-12-24T17:20:15+5:30

आजच्या धावपळीच्या जीवनात माणसाची मन:शांती कुठेतरी हरवली आहे. त्यामुळे मनुष्य हा कमकुवत बनलेला आहे. त्याचा परिणाम म्हणजे शरीर रोगाचे भांडार बनलेले आहे. यासाठी मानवी जीवनात अध्यात्म शास्त्राचे महत्व वाढलेले नव्हे अत्यंत आवश्यक बनले आहे. मनोबल वाढविण्यासाठी अध्यात्माचा आधार घेणे ही आजच्या काळाची गरज आहे.

Increase morale ... be happy ... | मनोबल वाढवा... आनंदी व्हा...

मनोबल वाढवा... आनंदी व्हा...

googlenewsNext

आजच्या धावपळीच्या जीवनात माणसाची मन:शांती कुठेतरी हरवली आहे. त्यामुळे मनुष्य हा कमकुवत बनलेला आहे. त्याचा परिणाम म्हणजे शरीर रोगाचे भांडार बनलेले आहे. यासाठी मानवी जीवनात अध्यात्म शास्त्राचे महत्व वाढलेले नव्हे अत्यंत आवश्यक बनले आहे. मनोबल वाढविण्यासाठी अध्यात्माचा आधार घेणे ही आजच्या काळाची गरज आहे.
भगवतप्राप्ती हे माणसाचे जीवनाचे अंतिम सत्य आहे. नेमके हेच माणूस विसरला आहे. श्रृती वचन असं सांगते की, ‘नायं आत्मा बलहिन लभ्यम्’ परमात्मा हा केवळ बलवानालाच भेटतो. साऱ्या संतांच्या मांदियाळीकडे बघितलं तर ते अध्यात्मिक दृष्टीने अत्यंत बलवान म्हणून त्यांना भगवंत भेटला.
माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. ‘जे दिठीहिन पविजे। जे दिठीवीन देखिजे। ते अतिंद्रिय लाहिजे। ज्ञान बळ।। ज्ञानाच्या बळानेही देव अनुभवता येतो. पण आज व्हाट्सअप, फेसबुक वरून इंटरनेटवरून आपण ज्ञान मिळवून ज्ञानी जरूर बनतो आहे. परंतु ते देव ओळखण्याचे ज्ञान नाही. म्हणून यासाठी वाचावी ज्ञानेश्वरी। डोळा पहावी पंढरी।। ज्ञान होय अज्ञानासी। ऐसावर या टिकेसी।. देव अनुभवण्याचे सर्वात सोपे बळ म्हणजे भावाचे बळ आहे पण एवढं सोपही बळ आपल्याकडे नाही. कारण माणसं भाव खातात. नेमकं जिथं भाव ठेवावा तिथं आपला भाव नाही आणि जिथं कृतीची गरज नाही तिथं आपण कृती करतो.
संसारात प्रगती करण्यासाठी कृतीच करा आणि देव मिळविण्यासाठी भावच ठेवा. आपण नेमकं उलटं करतो संसार भावनेने आणि परमार्थ कृतीने.
संत वाङ्मयात काही बळं सांगितली आहे. वैराग्याचे बळ, योगाचे बळ, ज्ञानाचे बळ, भावाचे बळ, निश्चयाचे बळ आदी. संत तुकाराम महाराजांच्या ्रजीवनामध्ये फार मोठे वैराग्याचे बळ होते. त्यामुळे वैराग्यातून जी भक्ती घडली त्यामुळे त्यांना देव भेटला. संसारात राहूनच त्यांनी वैराग्य अनुभवलं, ‘संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पूण्यधर्म केला’ योगाच्या बळाने माऊली ज्ञानेश्वरांना देव भेटला’ अंगी योगाचे बळ । मन केतुले चपळ’ आज आम्हीही योग करतो. यम, नियम, ध्यानधारणा, प्रत्याहार, प्राणायाम, स्वाध्याय, आसन, समाधी हे अष्टांग योग माऊलींनी केली म्हणून ते योगी बनले आणि त्याना देव भेटला.
देव आपली कृती नाही पाहत भाव पाहतो. ‘अंतरीची घेतो गोडी। पाहे जोडी भावाची।।
या पैकी कोणतेच बळ नसेल तर कमीत कमी निश्चयाचे बळ तरी असावे. निश्चय काय करू शकत नाही. तुकाराम महाराज सांगतात, निश्चयाचे बळ। तुका म्हणे तेचि फळ।।
म्हणून मनोबल वाढवूृ या, अध्यामाचा आधार घेऊन आनंदी राहून जन्माचे सार्थक करु या...

- भाऊराव महाराज, मुक्ताईनगर.

Web Title: Increase morale ... be happy ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव