वातावरणातील बदलाने रुग्ण संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 02:47 PM2019-11-01T14:47:22+5:302019-11-01T14:49:33+5:30
चाळीसगाव तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने हे वातावरण आरोग्यासाठी अपायकारक आहे.
रईस शेख
मेहुणबारे, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने हे वातावरण आरोग्यासाठी अपायकारक आहे. यामुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’च्या रुग्णांची संख्या वाढतच असून मेहुणबारे, ता.चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रोजचे बाह्य रुग्ण पन्नासावर येत आहेत. दुसरीकडे खाजगी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. या व्हायरल इन्फेक्शनचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने सर्दी, ताप, मळमळ, खोकला, अंग दुखणे, घशात खवखव व उलटीसारखी लक्षणे वाढली आहेत.
पावसामुळे वातावरणातल्या बदलाने संसर्गजन्य आजारात वाढ झाली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. दूषित पाणीपुरवठ्याने गॅस्ट्रो व मलेरियाच्या रुग्णात वाढ झाली आहे. ढगाळ वातावरण, कधी पाऊस, पावसामुळे थंडीचे वातावरण यामुळे जीवाणू व विषाणूंच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा सर्वाधिक फटका लहान मुलांच्या आरोग्याला बसत आहे. प्रतिकारक्षमता कमी असल्याने त्यांना संसर्गजन्य आजाराचा धोका असतो. मुले व वृद्धांना जास्त धोका वातावरणात बदल झाला की व्हायरलचा धोका अधिक असतो. या वातावरणाचा व व्हायरलचा सर्वाधिक फटका लहान मुले तसेच वृद्धांना बसण्याची दाट शक्यता अधिक असते. त्यामुळे लहान मुले व वृद्धांची काळजी घेण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांंचे म्हणणे आहे.
दमाच्या रुग्णांना ञास
वातावरणाच्या परिणामामुळे ज्यांना दमाचा ञास होत आहे अशा ज्येष्ठांच्या श्वसनक्रियेवर परिणाम होत असून त्यांना खुपच ञास होत आहे.दमाचा आजार असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. सध्याच्या वातावरणामुळे वायरल इन्फेक्शनचा धोका अधिक आहे. तापासह थंडी, सर्दी, खोकला, मळमळ, उलटी, अंग दुखणे आणि डोके दुखण्याचे विकार असलेल्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. व्हायरल इन्फेक्शनचे आठवडाभरात मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात १७६च्या आसपास रुग्णांनी उपचारासाठी आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
व्हायरल इन्फेक्शनकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. लहान मुलांकडे या वातावरणात विशेष लक्ष देण्याचे आवाहन बालरोगतज्ज्ञांनी केले आहे. गावोगावी स्वच्छतेचा अभाव असल्याने साथीचे रोग पसरत आहे. यामुळे प्रत्येक गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे.
कोरडा दिवस पाळावा
या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त आहे. सांडपाणी व साठवणूक केलेले पाणी व गावेगाव असलेले कचऱ्याचे ढीग यामुळे रोगराई पसरत असून, मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. तसेच वातावरणातील बदलांमुळे व्हायरल इन्फेकशन सर्वत्र होत आहे. थोडा त्रास वाटल्यास नागरिकांनी त्वरित डॉक्टराचा सल्ला घ्यावा. तसेच पाणी उकळून प्यावे. आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांंचे म्हणणे आहे.
तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीनी आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळलाच पाहिजे. तसेच गावात तुंबलेल्या गटाराची पाणी मोकळी करुन वाहती करावी. धुरळणी यंत्राने औषध फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.
‘इन्फेक्शन’ची लक्षणे
थंडीवाजून ताप येणे
मळमळ होणे
डोक व संपूर्ण अंग दुखणे
सर्दी, खोकला
श्वास घ्यायला त्रास होणे
औषध घेतल्यावरसुध्दा तीन दिवस ताप चढउतार राहणे
उपाय
शक्यतोवर पावसात ओले होऊ नये
पाणी उकळून प्यावे
डासांपासून बचाव करणे
घरासह परिसर स्वच्छ ठेवणे
व्हायरल असलेल्या रुग्णाच्या संपर्क टाळणे
या वातावरणात लहान मुलांना हातात पंजा व पायात मोजे घालून त्यांची निगा ठेवावी. आपल्या घराच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. जेणेकरून डास, मच्छर होणार नाही. ताप किंवा थंडी वाजून आल्यास तातडीने रुग्णालयात उपचार घ्यावा. पाणी गरम करून प्यावे.
-डॉ वैधवी पंडित
वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, मेहुणबारे