प्लॅस्टिकबंदीपेक्षा जनजागृती करून पुनर्वापर वाढवा, जळगावात प्लॅस्टिक असोसिएशनची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:02 PM2018-03-28T12:02:17+5:302018-03-28T12:02:17+5:30
बंदी अन्यायकारक असल्याचा सूर
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २८ - राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी करणे हा उद्योगासह व्यापाऱ्यांसाठी अन्यायकारक निर्णय असून याचा सरकारने सामंजस्याने विचार करावा, प्लॅस्टिक हे पूर्णपणे पुननिर्मित होणारे असून सरकारने त्यावर बंदीपेक्षा त्याचा पुनर्वापर वाढवावा आणि या विषयी जनजागृती करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेदरम्यान जळगाव जिल्हा प्लॅस्टिक असोसिएशनच्यावतीने किरण राणे यांनी केली. दरम्यान, ३० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावात येत असल्याने त्यांना या संदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतल्याने याचा जळगावात मोठा परिणाम होणार आहे. या संदर्भात मंगळवारी दुपारी रोटरी भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी किरण राणे यांच्यासह नितीन रेदासनी, अमित भुतडा, सुभाष तोतला, रमेश माधवानी उपस्थित होते.
प्लॅस्टिकविषयी चुकीची माहिती
प्लॅस्टिक नष्ट होत नाही, यामुळे पर्यावरणास धोका निर्णाण झाल्याचा चुकीचा प्रचार केला जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले. उलट प्लॅस्टिक पूर्णपणे पुर्ननिर्मित होते, असे सांगून याचा रस्ते करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात वापर होऊन लागल्याने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लॅस्टिकचा ‘गोल्डन मटेरिअल’ म्हणून गौरव केला आहे, तरीदेखील राज्य सरकार यावर बंदी आणत असल्याच्या धोरणावर या वेळी टीका करण्यात आली.
उद्योजक, व्यापारी देशोधडीला लागतील
प्लॅस्टिक उद्योग, व्यापार सुरू करताना त्यांनी सरकारचीच परवानगी घेतली व अब्जावधी रुपये गुंतवून उद्योग उभे केले. सरकार एका दिवसात निर्णय घेऊन ते बंद करण्याचे म्हणत असल्याने उद्योजक, व्यापारी देशोधडीला लागतील, अशी भीती या वेळी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे सरकारने याचा सामंजस्याने विचार करावा, अशी मागणी राणे यांनी केली.
...तर एकही झाड शिल्लक राहणार नाही
दैनंदिन जीवनातील वापराच्या चहा वस्तूंसाठी ९० टक्के प्लॅस्टिकचा वापर होतो. प्लॅस्टिकला पेपर बॅगचा पर्याय शिल्लक राहतो, मात्र दररोज एवढ्या मोठ्या प्रमाणात पेपर बॅगचा वापर वाढला तर भारतात एकही झाड शिल्लक राहणार आहे, असे या वेळी सांगण्यात आले. या सोबतच पेपर बॅग तयार करण्यासाठी पाण्याचाही मोठा वापर होईल, त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईची शक्यता नाकारता येत नाही, असाही मुद्दा या वेळी मांडण्यात आला.
अपले अपयश लपविण्यासाठी तुघलकी निर्णय
प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचा -हास होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र राज्यात सर्वत्र आढळणारा प्लॅस्टिक कचरा यास शासनाचे घनकचरा व्यवस्थापनातील अपयश कारण असून आपले अपयश लपविण्यासाठी सरकारने असा तुघलकी निर्णय घेतलाआहे.
गुजरातमध्ये जावून उद्योग उभारावा का?
जळगाव शहरात उद्योग उभारणीस पूरक वातावरण नाही, त्यात जे उद्योक आहे ते आता बंद होऊन बेरोजगारीही वाढेल व उद्योजक, व्यापाºयांना करोडोंचा फटका सहन करावा लागेल. अशा परिस्थितीत गुजरातमध्ये जाऊन उद्योग उभारावा का? असा संतप्त सवाल सुभाष तोतला यांनी उपस्थित केला.
जळगाव हे प्लॅस्टिक पुनर्वापराचे उत्तम उदाहरण
प्लॅस्टिक हे वाईट नाही ते वाईट बनविले गेले. त्याचा पुनर्वापर शक्य आहे. जळगावातच प्लॅस्टिकचा पुनर्वापर करून चटई तयार करणारे २५० उद्योग असल्याचे किरण राणे यांनी सांगून पुनर्वापराचे हे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले.
मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन
प्लॅस्टिक बंदीचा निर्णय अन्यायकारण असून याबाबत सहानुभूतीपूर्वीक विचार करावा, अशा मागणीचे निवेदन ३० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील हे जळगावात येत असल्याने त्यांना देण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले.