गौण खनिज रॉयल्टी दरात दीडपटीने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:12 AM2021-06-19T04:12:16+5:302021-06-19T04:12:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गौणखनिजाच्या स्वामित्वधनाचे (रॉयल्टी) दर आता ४०० रुपये प्रति ब्रासवरून ६०० रुपये प्रति ब्रास करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गौणखनिजाच्या स्वामित्वधनाचे (रॉयल्टी) दर आता ४०० रुपये प्रति ब्रासवरून ६०० रुपये प्रति ब्रास करण्यात आले आहे. १ जुलैपासून याची अंमलबजावणी होणार असून यामुळे वाळूसह सर्वच गौण खनिजाचे दर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वाळू असो अथवा इतर कोणत्याही गौण खनिजासाठी महसूल विभागाकडे स्वामित्वधन (रॉयल्टी) भरावी लागते. आतापर्यंत हे दर ४०० रुपये प्रति ब्रास होते. मात्र आता महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम २०१३ यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या विषयी महसूल व वनविभागाच्यावतीने संबंधित विभागांना पत्र देण्यात आले आहे. या सुधारणानंतर स्वामित्वधनाचे (रॉयल्टी) दर आता थेट दीडपटीने वाढणार आहे.
या घटकांना लागू राहणार दरवाढ
बांधकामासह इतर प्रयोजनासाठी वापरण्यात येणारी वाळू, चुनखडी व शिंपल्यापासून तयार केलेला चुना, उत्खनन किंवा गोळा करून काढलेले सर्व दगड, दगडाची भुकटी, बांधकामासाठी वापरण्यात येणारा जांभा दगड, उत्खनन किंवा गोळा केलेले गोटे, बारीक खडी, मुरुम, कौलारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी चिकणमाती, भरणा, सपाटीकरणासाठी वापरण्यात येणारी माती, पाटीचा दगड, नरम खडक, विटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी माती (२४० रुपये प्रति ब्रास).