कुरंगी नांद्रा परिसरात चोरीचे प्रमाणात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:11 AM2021-07-05T04:11:39+5:302021-07-05T04:11:39+5:30
कुरंगी, ता. पाचोरा : कुरंगी-बांबरूड राणीचे या जिल्हा परिषदेच्या गटात मागील आठवडाभरापासून चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून, तीन दुचाकी ...
कुरंगी, ता. पाचोरा : कुरंगी-बांबरूड राणीचे या जिल्हा परिषदेच्या गटात मागील आठवडाभरापासून चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून, तीन दुचाकी व एक घरफोडी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा तपास लावून रात्रीची गस्त घालावी, अशी मागणी होत आहे.
कुरंगी नांद्रा परिसरातील दुचाकी चोरट्यांनी वरसाडे प्र. बो. येथील ललित विक्रम पाटील यांनी माहिजी येथील युनूस शेख प्यारू यांच्याकडून वापरण्यासाठी घेतलेली दुचाकी (एमएच १९बीव्ही ८१३५) ही दिनांक २६ जून रोजी वरसाडे डोकलखेडा रस्त्यालगत असलेल्या घरच्या शेतात दुपारी गाडी घेऊन गेले होते. आपल्या शेताची पाहणी करत असताना अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा गाडी चोरून नेल्याची पोलिसात नोंद करण्यात आली आहे, तर दिनांक १ जुलै रोजी कुरंगी येथील पंढरीनाथ उत्तम पाटील यांच्या मालकीची दुचाकी घरासमोरून रात्रीच्या वेळी चोरट्यांनी चोरली तर तिसरी गाडी दिनांक ३ जुलै रोजी हडसन (ता. पाचोरा) येथील भरतसिंग लोटन पाटील यांची गाडी हडसन पाचोरा रोडलगत असलेल्या शेतातून भरदुपारी भरतसिंग पाटील शेती पाहणी करत असताना चोरली गेली आहे.
याच परिसरात एका डॉक्टरचे घरही चोरट्यांनी फोडले आहे. या चोऱ्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस यंत्रणेने चोरीचा तपास लावून बंदोबस्त करावा व या परिसरात गस्त घालावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.