बोरी धरणाच्या पाणीपातळीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:13 AM2021-07-17T04:13:53+5:302021-07-17T04:13:53+5:30
पारोळा : तामसवाडी ता. पारोळा येथील बोरी धरणात पाणलोट क्षेत्रात बोरकुंड, विंचूर, मालेगाव या परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने बोरी ...
पारोळा : तामसवाडी ता. पारोळा येथील बोरी धरणात पाणलोट क्षेत्रात बोरकुंड, विंचूर, मालेगाव या परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने बोरी धरणाच्या पाणीपातळीत एक ते सव्वामीटरने वाढ झाली आहे. अजून एकदा मुसळधार पाऊस झाल्यास धरण भरण्यास वेळ लागणार नाही. यामुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.
बोरी धरण भरणे सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहे कारण या धरणावर पारोळा शहरासह ३६ गावांची सामूहिक पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. तसेच शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी आवर्तने सोडली जातात. तर इतर गावांना पाणीटंचाई निर्माण झाली तर नदीतून आवर्तन सोडण्यात येते. या पहिल्याच पावसात धरण ३८ टक्के भरले आहे. १३ जुलै रोजी शून्य जलसाठा होता. या दोन-तीन दिवसात ३८ टक्क्याने वाढला आहे. धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने तूर्ततरी पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. धरणात १६ जुलै रोजी दुपारी २ वाजता पाणी पातळी २६४.९५ मी. जिवंत साठा ९.६५ दलघमी, टक्केवारी ३८ टक्के होती.