तालुका पातळीवरही वाढीव बेड - पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:17 AM2021-04-21T04:17:06+5:302021-04-21T04:17:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना महामारीत जिल्हावासियांसाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना महामारीत जिल्हावासियांसाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढली तरी मोहाडी येथील रूग्णालयात उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक तालुका पातळीवर देखील रूग्णांना वाढीव बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. याचा रूग्णांना लाभ होणार असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
पालकमंत्री पाटील यांनी कॅबिनेट बैठकीत जिल्ह्यातील स्थितीचा आढावा सादर केला. यासोबत पाटील हे मंत्रीमंडळाच्या बैठकीत जळगाव येथून सहभागी झाले. यात त्यांनी जिल्ह्यात नव्या निर्बंधांचे पालन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाची कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत महत्वाची बैठक घेतली. यात जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी यांची उपस्थिती होती. यात पालकमंत्र्यांनी कोविड रुग्णांना दिल्या जाणार्या उपचारांबाबत सूचना दिल्यात. रुग्णांना ऑक्सीजन पुरवठा गरजेनुसार करणेबाबत निर्देश दिले.
जिल्हा प्रशासनाच्या बेड मॅनेजमेंट सिस्टीममुळे रूग्णांना लाभ होत असून याच प्रकारे रेमडेसिविरचा अचूक पुरवठा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
राम नवमी, हनुमान जयंती साधेपणाने साजरे करा
राज्य शासनाने कडक लॉकडाऊनचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी या बंदचे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. तर जिल्ह्यातील नागरिकांनी रामनवमी आणि हनुमान जयंती हे उत्सव अतिशय साधेपणाने साजरे करावेत असे आवाहन देखील त्यांनी केले.