खाजगी डेअरींच्या वाढत्या स्पर्धेत ग्राहकांना दरवाढीचा दणका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 11:35 AM2020-03-07T11:35:48+5:302020-03-07T11:36:27+5:30
गायीसह म्हशीच्या दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ, लागलीच अंमलबजावणीही केली सुरु
ममुराबाद, ता. जळगाव : गुजरात राज्यातील दूध संघासह स्थानिक खासगी डेअरींच्या वाढत्या स्पर्धेपुढे हतबल झालेल्या जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (विकास) शेतकऱ्यांकडून पुरवठा होणाºया दुधाच्या खरेदीदरात नुकतीच वाढ केली. खरेदीदर वाढवल्यानंतर गायीसह म्हशीच्या दूध विक्री दरातही संघाने प्रतिलिटरमागे दोन रुपयांची वाढ जाहीर केली असून, त्याची अंमलबजावणी ६ मार्चपासून सुरूदेखील झाली आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या सुरूवातीला गुजरात राज्यातील दूध संघ तसेच स्थानिक खासगी दूध डेअरींची फार स्पर्धा नसल्याने जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे दैनंदिन दूध संकलन सुमारे चार लाख लीटर इतके होते.
तुलनेत यंदा मोठी स्पर्धा असल्याने जळगाव दूध संघाचे दैनंदिन संकलन तीन लाख लीटरपर्यंत खाली आले आहे. प्राप्त माहितीनुसार संघाकडे सद्य:स्थितीत गायीचे १ लाख ८० हजार लीटर तसेच म्हशीच्या १ लाख २० हजार लीटर दुधाचा पुरवठा होत आहे.
गेल्या वर्षी गायीसह म्हशीच्या दुधाचे खरेदीदर कमी असूनही संघाकडील दैनंदिन संकलन मोठ्या प्रमाणात होते.
दूध गुजरातकडे
त्यामानाने यंदा खरेदीदरात भरमसाट वाढ होऊनही दुधाचे संकलन वाढत नसल्याने संघाच्या नाकीनऊ आले आहेत. स्पर्धात्मक खरेदीदरामुळे जिल्ह्यातून दररोज सुमारे ५० हजार लीटर दूध गुजरात राज्यात रवाना होऊ लागले आहे.
दुसरीकडे स्थानिक खासगी डेअरींकडूनही विकासपेक्षा जास्तीचे खरेदीदर तसेच आगावू रक्कम देऊन दुधाची खरेदी वाढविण्यात आली आहे.
अनेक डेअरींचे आव्हान
त्याचा मोठा फटका आतापर्यंत सहन करणाºया जळगाव दूध संघासमोर बोदवडच्या अमर डेअरीसह चोपड्याच्या बापू डेअरीसारख्या इतर काही खासगी डेअरींनी आणखी नवे आव्हान उभे केले आहे.
खाजगी डेअरीकडे ओढा
खासगी डेअरींकडून जिल्हांतर्गत वितरीत होणाºया दुधाचे विक्रीदर आजही कमीच आहेत. त्याचा विपरीत परिणाम विकास दुधाच्या खपावर यापूर्वीच झालेला असून, विक्रीदरात नव्याने वाढ झाल्यानंतर विकासच्या ग्राहकांचा खासगी डेअरींकडून वितरीत दुधाकडे ओढा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागणीनुसार पुरवठा नसल्याच्या स्थितीत दुधाचे खरेदीदर वाढविण्याची वेळ आल्यानंतर विक्रीदर वाढविण्याशिवाय दुसरा पर्याय जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासमोर नव्हता. गाय तसेच म्हशीच्या दुधाचे विक्रीदर प्रतिलिटर साधारण दोन रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. नवीन दराची अंमलबजावणी ही ६ मार्चपासून लागू देखील झाली आहे.
- के. बी. पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक, जळगाव जिल्हा दूध संघ.
खासगी दूध व्यावसायिकांच्या तुलनेत विकासचे दूध तसेच अन्य दुग्धजन्य पदार्थ यापूर्वीच किमतीने थोडे महाग होते. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी देखील पसरलेली असतांना दुधाच्या विक्रीदरात प्रतिलिटरमागे आणखी दोन रुपयांची वाढ झाली आहे. स्वस्त पर्याय शोधणारे ग्राहक त्यामुळे विकास व्यतिरिक्त इतर दूध खरेदीला प्राधान्य देण्याची शक्यता वाढली आहे. - दूध बूथ चालक, जळगाव.