ऑनलाइन एज्युकेशनमुळे पालकांचा वाढला खर्च; मोबाईल, टॅब, इंटरनेटची भर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:11 AM2021-07-04T04:11:59+5:302021-07-04T04:11:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा ऑनलाइन वर्ग घेत आहेत. त्यासाठी इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा ऑनलाइन वर्ग घेत आहेत. त्यासाठी इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एका मोबाइलच्या कनेक्शनला एक ते दीड जीबी इंटरनेट मिळते. मात्र, ऑनलाइन वर्गामुळे दुपारपर्यंत ते संपून जाते. त्यामुळे पालकांना रोजच्या कामासाठी पुन्हा नेट पॅक खरेदी करावा लागत असल्याने अनेकांना हा खर्च पेलवत नाही. त्यात मोबाइल, लॅपटॉप, टॅबला मागणी वाढली आहे. त्यामुळे पालकांच्या खर्चात आणखी वाढ झाली आहे.
यंदा १५ जूनपासून जिल्ह्यासह शहरातील जवळपास बहुतांश शाळांनी ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठविण्याची जबाबदारी नसली, तरी आता मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी स्मार्टफोनसमोर बसवून ठेवण्याची जबाबदारी मात्र पालकांवर आली आहे. इंटरनेट कनेक्शनपासून अचानक लाइट जाण्यापर्यंतच्या अनेक समस्यांना या ऑनलाइन शिक्षणादरम्यान पालकांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातही अजून एक महत्त्वाची समस्या म्हणजे घरी असलेली दोन मुले आणि एकच स्मार्टफोन. यामुळे अनेक पालकांना एक दिवस केवळ एकाच पाल्याला शिक्षणासाठी स्मार्टफोन उपलब्ध करून द्यावा लागत आहे. त्यामुळे दुसऱ्या पाल्याला त्या दिवशीच्या ऑनलाइन वर्गांना उपस्थित राहणे अशक्य होत आहे.
सीमकार्ड कंपन्यांनाही ‘अच्छे दिन’
मोबाइलची मागणी वाढल्यामुळे साहजिकच सीमकार्ड कंपन्यांनाही ‘अच्छे दिन’ आले असून, जूनमध्ये शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने सीमकार्ड विक्रीसोबत मोबाइल रिचार्जमध्ये मोठी उलाढाल झाली आहे. टॅब, लॅपटॉप, मोबाइलमध्ये सर्वाधिक मोबाइलची विक्री झाली आहे. दरम्यान, ऑनलाइन शिक्षणामुळे पालकांच्या दैनंदिन खर्चात वाढ झाली आहे. आधी महिन्याला अडीचशे रुपयांचे रिचार्ज करावे लागत होते. मात्र, आता चारशे ते पाचशे रुपयांचे रिचार्ज करावे लागत असल्याचे पालकांनी सांगितले, तसेच आठ ते दहा हजार रुपयांचे मोबाइल खरेदी करावे लागत आहेत.
दररोज एक जीबी डेटा मोबाइल कंपनीकडून मिळतो. पूर्वी आम्ही हा डेटा पूर्ण दिवस वापरायचो. आता मुलांचे ऑनलाइन वर्ग सकाळीच सुरू होतात. दुपारी १२ वाजेपर्यंत तेवढा डेटा संपूनही जातो. त्यामुळे आमच्या इतर कामांसाठी आम्हाला पुन्हा नव्याने डेटा पॅक घ्यावा लागतो.
-दीपाली भालेराव, पालक
०००००००
ऑनलाइन शिक्षणापासून मुले वंचित राहू नयेत यासाठी नुकतेच लॅपटॉप व मोबाइल खरेदी केला आहे. दोन्ही मुलांच्या ऑनलाइन तासिकांच्या वेळी त्यांच्याजवळ बसून राहावे लागते. दिलेल्या अभ्यासाची नोंद करून तो पाल्यांकडून करून घेतला जातो. प्रत्यक्ष शाळा कधी सुरू होतील, याची आता प्रतीक्षा लागून आहे.
-रंजना पाटील, पालक
००००००००
मुलांचे हाेतेय नुकसान
ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाइल, टॅब, संगणक, लॅपटॉप, अशा डिव्हाइसचा वापर वाढला आहे. त्यामुळे दिवसभरात किमान चार ते पाच तास मुलांच्या डोळ्यांपुढे कोणत्या ना कोणत्या प्रकारचा स्क्रीन डोळ्यासमोर येऊ लागल्याने त्याचा थेट परिणाम चष्म्याचा नंबर वाढण्यात झाला असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले, तसेच अनेक मुलांना स्मार्टफोनचे व्यसन जडले आहे. अनेकांना तर मुलांनी भलतीच वेबसाइट सुरू केल्यामुळे आर्थिक भुर्दंड बसल्याचेही प्रकार घडत आहेत. यामुळे पालकांना आर्थिक नुकसानीचा फटकासुद्धा सहन करावा लागत आहे.
००००००००००
जिल्ह्यातील वर्गनिहाय विद्यार्थी
एकूण विद्यार्थी
पहिली : ७६,५१४
दुसरी : ७९,३१३
तिसरी : ७७,९१८
चौथी : ८०,०५०
पाचवी : ७८,८२८
सहावी : ७७,३११
सातवी : ७७,६७७
आठवी : ७६,३८५
नववी : ७६,३५८
दहावी : ५८,३१७