जळगावात उन्हाळी फळांना वाढली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 05:42 PM2018-04-09T17:42:29+5:302018-04-09T17:42:29+5:30
उन्हाळा लागताच बाजारात उन्हाळी फळांची आवक वाढली आहे. सध्या टरबूज, द्राक्ष, खरबूज, संत्री यांना जास्त मागणी आहे. दररोज तीन चे चार क्विंटल टरबूजची विक्री होत असून त्या खालोखाल द्राक्षांना मागणी आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.९ : उन्हाळा लागताच बाजारात उन्हाळी फळांची आवक वाढली आहे. सध्या टरबूज, द्राक्ष, खरबूज, संत्री यांना जास्त मागणी आहे. दररोज तीन चे चार क्विंटल टरबूजची विक्री होत असून त्या खालोखाल द्राक्षांना मागणी आहे. सध्या टरबूजचे भावही आवाक्यात असून २० रुपये प्रति किलोने ते विक्री होत असल्याने त्यास ग्राहकीही चांगली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
‘गरीबांच्या फ्रिज’ला मागणी
गरीबांचा फ्रिज म्हणून ओळख असलेल्या पाण्याच्या माठांनाही चांगलीच मागणी वाढली आहे. शहरातील आकाशवाणी चौक, रिंग रोड, अजिंठा चौफुली, महामार्गावरच्या बाजूला, पिंप्राळा रस्त्यावर माठ विक्रेत्यांनी दुकाने थाटली असून तेथे खरेदीसाठी लगबग दिसून येते. सध्या माठही वेगवेगळ््या आकार व प्रकारात उपलब्ध असून त्यांना पसंती दिली जात आहे. माठाला आता तोटीही बसवून मिळत असल्याने त्यांना मागणी असल्याचे विके्रत्यांनी सांगितले. या सोबतच गोलाकार माठासह नक्षीकाम असलेले, रंगबिरंगी माठ विक्रीसाठी आले आहेत. दररोज किमान दीडशे ते दोनशे माठ विक्री होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. १०० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत लहान-मोठे माठ उपलब्ध आहेत.
सध्या मागणी असलेल्या फळांचे भाव
- टरबूज- २० रुपये प्रती किलो
- खरबूज - ३० रुपये
- द्राक्ष - ७० ते ८० रुपये
- संत्री ५० ते ६० रुपये
- मोसंबी - ६० ते ७० रुपये
- सफरचंद - १२० ते १६० रुपये
- रामफळ - ९० ते १२० रुपये
(भाव प्रति किलो)
सध्या उन्हाळी फळांना चांगलीच मागणी वाढली असून टरबूज खरेदीला अधिक प्राधान्य दिले जात आहे.
-पिरन शहा, फळ विक्रेते.