वधारलेल्या खाद्य तेलात नरमाई टमाटे, बटाटेही झाले स्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:17 AM2021-01-25T04:17:34+5:302021-01-25T04:17:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या महिन्यापासून भाववाढ झालेल्या खाद्य तेलाच्या भावात या आठवड्यात घसरण झाली असून सोयाबीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या महिन्यापासून भाववाढ झालेल्या खाद्य तेलाच्या भावात या आठवड्यात घसरण झाली असून सोयाबीन तेलाचे भाव १२५ ते १३० रुपयांवरून ११५ ते १२० आले आहेत. शेंगदाणा तेल मात्र स्थिर असून शेंगदाण्याचे भाव वाढले आहे आहे तर साबुदाण्याचे भाव कमी झाले आहेत. भाजीपाल्याच्या भावात मात्र बहुतांश भाज्यांचे भाव मात्र स्थिर आहे तर टमाटे, बटाटे स्वस्त झाले आहेत.
दोन आठवड्यापूर्वी किराणा साहित्यासह भाजीपाल्याच्या भावात चांगलीच वाढ झाली होती. मात्र या आठवड्यात खाद्य तेलाचे भाव कमी झाल्याने तेवढा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून १२५ ते १३० रुपयांवर असलेल्या सोयाबीन तेलाच्या भावात घसरण होऊन ते ११५ ते १२० रुपयांवर आले आहेत.
शेंगदाणा तेल मात्र अजूनही १६० ते १७० रुपये प्रति किलोवर स्थिर आहे. शेंगदाणे १०५ ते ११० रुपयांवरून ११० ते १२० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे तर साबुदाण्याचे भाव कमी होऊन ते ६५ ते ७० रुपयांवरून ५५ ते ६० रुपयांवर आले आहे.
साखर अजूनही स्थिर
तीन आठवड्यांपूर्वी भाव कमी झालेल्या साखरेचा गोडवा अजूनही कायम आहे. त्या वेळी ३८ रुपये प्रति किलोवरून ३६ रुपये प्रति किलोवर आली होती. ती अद्यापही याच भावावर कायम आहे. मकर संक्रांत झाली तरी या काळात साखरेचे भाव वाढले नव्हते.
टमाट्याची आवक वाढली
एरव्ही हिवाळ्यामध्ये टमाट्याचे भाव कमी असतात. डिसेंबरमध्ये अधिक भाव असलेल्या टमाट्याचे भाव कमी होऊन १० रुपये प्रति किलोवर आले आहेत.
बटाटे आवाक्यात
गेल्या दोन ते तीन महिन्यात बटाट्याचे भाव चांगलेच वधारून ते ५० रुपये प्रति किलोवर पोहचले होते. मात्र गेल्या महिन्यापासून नवीन बटाट्याची आवक वाढून हे भाव कमी-कमी होत गेले व आता तर लहान बटाटे १० ते १५ रुपये प्रति किलोवर आले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी ते ३० रुपये प्रति किलो होते.
खाद्य तेलासह बटाट्याचेही भाव कमी झाल्याने दिलासा आहे. विशेष म्हणजे टमाट्याचे भाव एकदच कमी झाल्याने व किराणा साहित्याचे भाव कमी झाल्याचा लाभ आहे.
- संजय चौधरी,
ग्राहक
गेल्या अनेक दिवसांपासून भाव वाढ झालेल्या सोयाबीन तेलाच्या भावात या आठवड्यात घसरण झाली आहे. शेंगदाण्याचे भाव वाढले असून साबुदाणा मात्र स्वस्त झाला आहे.
- सचिन छाजेड,
व्यापारी
सध्या टमाटे, बटाटे यांची आवक चांगलीच वाढली असून त्यामुळे त्यांचे भाव कमी झाले आहे. यासह कोथिंबीर व इतर भाज्याचे भाव स्थिर असून सध्या आवक चांगली आहे.
- रमेश वाणी, भाजीपाला विक्रेते