जळगावात पेट्रोलिंग वाढवले; ठिकठिकाणी पोलीस पॉइंट
By विजय.सैतवाल | Published: October 31, 2023 08:16 PM2023-10-31T20:16:02+5:302023-10-31T20:16:12+5:30
राज्यभरातील आंदोलनाच्या भडक्याच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग वाढविले
जळगाव : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभरात आंदोलनाचा भडका उडाल्याने जळगावपोलिस दलही अलर्ट झाले आहे. लोकप्रतिनिधी राहत असलेल्या परिसरासह शहर व जिल्ह्यात पेट्रोलिंग वाढविण्यात आली असून ठिकठिकाणी पोलिस पॉईंट देखील लावले जात आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन सुरू आहे. त्यात बस फोडण्यासह मराठवाड्यात सोमवारी आमदारांचे निवासस्थानही जाळण्यात आले. जळगाव शहर व जिल्ह्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन होत आहे. मात्र इतर ठिकाणच्या घटना पाहता पोलिस प्रशासन जिल्ह्यात लक्ष ठेवून असून आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधी राहत असलेल्या परिसरासह इतर भागातही सोमवारी रात्रीपासून पेट्रोलिंग वाढविण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली. या शिवाय आवश्यक त्या ठिकाणी पॉईंट लावण्यात येऊन पोलिसांकडून घडामोडींवर नजर ठेवली जात आहे. शहर व जिल्ह्यात ज्या-ज्या ठिकाणी उपोषण, बंद व इतर आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू असून त्यास पोलिसांकडून सहकार्य केले जात आहे. मात्र ज्या ठिकाणी आदेशाचे पालन होत नसेल तेथे कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारादेखील पोलिस प्रशासनाने दिला आहे.
लोकशाही मार्गासाठी सहकार्य
जिल्ह्यात होणारे उपोषण, बंद, आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू आहे. तरीदेखील काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता म्हणून पेट्रोलिंग वाढविण्यासह आवश्यक ठिकाणी पॉईंट लावले जात आहे. तसेच लोकशाही मार्गाने उपोषण व इतर आंदोलनांना सहकार्य आहे. मात्र आदेशाचे पालन न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक.