यावलसह परिसरात हिवतापासह खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 07:18 PM2019-08-04T19:18:19+5:302019-08-04T19:19:26+5:30
यावल तालुक्यासह यावल शहर व परिसरात वातावरणाच्या बदलामुळे हिवताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
चुंचाळे, ता.यावल, जि.जळगाव : तालुक्यासह यावल शहर व परिसरात वातावरणाच्या बदलामुळे हिवताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे ग्रामीण रुग्णालयातही रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. रुग्णांमध्ये परिसरातील सातोद, कोळवद, बोरावल, प्रिंप्री, टाकरखेडा, विरावली या गावातील रूग्णांचा समावेश आहे.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यात विविध ठिकाणी व परिसरात मागील आठ ते दहा दिवसांपासून सर्वत्र संततधार पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे परिसरातील वातावरणात कमालीचा बदल झाला आहे.
बदललेल्या या वातावरणात नागरिकांनी आपल्या आरोग्याविषयी काळजी घेण्यासाठी आपल्या घरातील व छतावर पावसाचे पाणी साचणार नाही व त्यामुळे डासांची निर्मिती होणार नाही याची अधिक काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणावरील उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये. घरातील रात्रीचे शिळे अन्न जेवणात देऊ नये. उदा. खिचडी आदी.
आपल्या घराच्या आवारात घाणीचे दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचे डबके साचणार नाही याची अधिक काळजी घ्यावी. पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा. या पावसाच्या वातावरणात नागरिकांनी आपल्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी, अशा सूचना वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आल्या आहेत.