वाढते अपघात चिंताजनक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 01:01 PM2018-05-09T13:01:39+5:302018-05-09T13:03:55+5:30
सुनील पाटील
अपघात कमी होण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना, जनजागृती होत असली तरी अपघातांची संख्या कमी व्हायला तयार नाही. सरकारी आकडेवारीनुसार दर वर्षी पाच लाख अपघात होतात व त्यात दीड ते दोन लाख लोकांचाजीव जातो. त्यात चिंताजनक बाब अशी आहे की, १८ ते ४५ या वयोगटातील तरुण ठार होण्याचे प्रमाण ६९ टक्के आहे. एकट्या महाराष्टÑाची आकडेवारी ८ टक्के आहे. सर्वाधिक अपघात अति वेग व त्यानंतर मद्य प्राशन केल्याने झालेले आहेत.
अपघातात जीव जाणारे तरुण व पुरुष हे घरातील प्रमुख तसेच कर्तेच आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडते. दरवर्षी राज्य शासनातर्फे रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते. या अभियानावर लाखो रुपये खर्च होतात. अपघात कमी होऊन लोकांचे जीव वाचावे हाच त्यामागचा उद्देश आहे. एका सर्वेक्षणात चालकाच्या चुकीमुळेच जास्त अपघात झालेले आहेत. शासन उपाययोजना करेल, त्यावर लाखो, कोट्यवधीचा खर्च होईल. शासकीय सोपस्कार पार पडले या सर्व बाबी होतील, मात्र नागरिक व वाहनधारक म्हणून प्रत्येकाचीही काही जबाबदारी आहेत. आपल्या चुकीमुळे स्वत:चा किंवा दुसऱ्या जीव जाईल किंवा कायमचे अपंगत्व येवू शकतो,याचे भान ठेवणे गरजेचे आहे. कोणी सांगेल तेव्हाच ऐकण्यापेक्षा स्वत:ला शिस्त लावली तरी अपघाताचे प्रमाण कमी होईल व त्यातून अनेकांचे जीव वाचतील. जळगाव जिल्ह्यात पाच वर्षात ४ हजाराच्यावर अपघात झाले आहेत. त्यात अडीच हजार जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा हजाराच्यावर तरुण व महिला जखमी झाल्या आहेत.गेल्या वर्षीच साडे चारशे जणांचा मृत्यू झाल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. ही शासकीय आकडेवारी आहे. प्रत्यक्षात असे अनेक अपघात आहेत की त्याची पोलीस दप्तरी नोंद नाही. मंगळवारचाच दिवस घेतला तर जिल्ह्यात पाच मोठे अपघात झाले. त्यात तीन जण ठार तर २० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या सर्व अपघातात चालकाच्याच चुका असल्याचे निदर्शनास आले. त्यात निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. त्यामुळे प्रत्येक वाहन चालकाने स्वत: लाच शिस्त लावली तर अनेक संकटे टळतील. त्याशिवाय वाहतूक पोलीस दंड करतील व तेव्हाच आपण शिस्त लावू ही मानसिकता घातक आहे. पोलिसांना पैसे देऊन शिस्त लावण्याची आवश्यकता का वाटते? मानव जन्म व मृत्यू इतका सोपा आहे का? याचाही विचार व्हायला हवा.