पारोळा बाजारपेठेतील ठेलागाडीचे वाढते अतिक्रमण ठरतेय डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 02:17 PM2021-03-03T14:17:47+5:302021-03-03T14:18:20+5:30
बाजारपेठेतील ठेलागाडीचे वाढते अतिक्रमण डोकेदुखी ठरत आहे.
पारोळा : बाजारपेठेत ठेलागाडीचालकांचे वाढते अतिक्रमण हा सर्वांचा डोकेदुखीचा विषय बनला आहे. रस्त्याच्या मध्यभागी ते आपली ठेलागाडी लावून भाजीपाला, फळे बिनधास्तपणे विक्री करतात. यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचा खूप त्रास होतो. विशेष करून महिला वर्गाला या त्रासाचा सामना करावा लागतो.
या सर्व गोष्टींवर पालिका प्रशासन अंकुश ठेवण्यात कमी पडताना दिसून येत असल्याचा आरोप होत आहे.
भाजीपाला विक्रेते ज्या ठिकाणी ठेलागाडी भाजीपाला विक्रीसाठी बाजारात लावतात त्या ठेलागाडीची परवानगी घेतली आहे का? असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. परंतु बाजारपेठेतील अतिक्रमणाबाबत कोणी बोलण्यास तयार नाही.
ठेलागाडीवर भाजीपाला व फळे विक्री करणारे विक्रेते आपली ठेलागाडीही बाजूला घेण्यास तयार नसतात. त्यांना कोणी बाजूला घे सांगण्यास गेले की, त्यातील काही लगेच हमरीतुमरीवर उतरतात. या बाजारपेठेत ठेलागाडी लावून वाहतुकीची कोंडी होते अशा विक्रेत्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.