महिलांमध्ये वाढतेय गर्भाशय कर्करोगाचे प्रमाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:23 AM2021-02-26T04:23:05+5:302021-02-26T04:23:05+5:30
जळगाव : महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. प्रत्येक महिन्याला किमान चार ते पाच रुग्ण समोर येत असल्याचे ...
जळगाव : महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. प्रत्येक महिन्याला किमान चार ते पाच रुग्ण समोर येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या आजारात जितके लवकर निदान तितका पुढील धोका टाळता येऊ शकतो, त्यामुळे या आजाराची लक्षणे व त्यानंतर तातडीने तपासणी हे प्रतिबंधात्मक उपाय जीव वाचवू शकते. ग्रामीण भागात जनजागृतीचा अभाव यामुळे या कर्करोगाचे प्रमाण अधिक वाढत असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासाठी जनजागृती होऊन संबंधित आजार जीवघेणा होण्यापासून वाचविणे शक्य होते.
डॉक्टर काय म्हणतात?
- गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण जिल्ह्यात वाढत आहेत. यात लवकर तपासणी करणे म्हणजेच प्रतिबंध हाच यावर उपाय आहे. अनेक प्रकरणांमध्ये अगदी शेवटच्या टप्प्यात हा कर्करोग गेल्यानंतर समजते व त्यानंतर खूप उशीर झालेला असतो. यासाठी महिलांनी लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करावी, असे स्त्री रोगतज्ञ डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले.
- स्थूलपणा, पोपीलोमा विषाणूचा संसर्ग, गर्भशयाच्या मुखावर होणारा संसर्ग, अधिक वेळा प्रसूती अशा विविध कारणांमुळे हा कर्करोग होण्याचा धोका असतो. ग्रामीण भागात याचे प्रमाण अधिक आहे. यासाठी जनजागृती करणे अधिक महत्त्वाचे आहे, अनेक वेळा रक्त जात असले तरी महिला दुर्लक्ष करतात, मात्र, हे धोकादायक ठरू शकते, असे औषधवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांनी सांगितले.
पहिली महिला याच आजाराने त्रस्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ९ महिन्यानंतर नॉन कोविड उपचार सेवा सुरू झाली. यात पहिली नोंदणी करणारी रावेर तालुक्यातील एक महिला तपासणीला आली होती. या महिलेवर या ठिकाणी शस्त्रक्रिया करून तिला पुढील उपचारांसाठी औरंगाबाद पाठविण्यात आले. मात्र, ही महिला अत्यंत उशिरा रुग्णालयात दाखल झाली होती, असेही डॉक्टरांनी सांगितले.