गंभीरतेच्या वाढत्या प्रमाणामुळे व्हेंटिलेटरविषयी दक्षताही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:14 AM2021-05-29T04:14:05+5:302021-05-29T04:14:05+5:30

स्टार ७५९ रिॲलिटी चेक लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक वाढल्याने, या ...

The increasing severity also increased the vigilance about the ventilator | गंभीरतेच्या वाढत्या प्रमाणामुळे व्हेंटिलेटरविषयी दक्षताही वाढली

गंभीरतेच्या वाढत्या प्रमाणामुळे व्हेंटिलेटरविषयी दक्षताही वाढली

Next

स्टार ७५९

रिॲलिटी चेक

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक वाढल्याने, या वाढत्या प्रमाणामुळे यंत्रणेला धडा शिकायला मिळाला. एका रुग्णापासून दुसऱ्या रुग्णाला बाधा होऊ नये व सध्या म्युकरमायकोसिसची स्थिती पाहता, व्हेंटिलेटरविषयी रुग्णालयांमध्ये अधिक दक्षता घेतली जात आहे. २४ तासांमध्ये चार वेळा व्हेंटिलेटरची स्वच्छता केली जात असून, संसर्ग रोखण्यासाठी रुग्णालयांमध्ये काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे, जळगावात ऑक्सिजन नर्स व ऑक्सिजन तंत्रज्ञ यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते या सर्व स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी होते. त्या तुलनेत दुसऱ्या लाटेत हे प्रमाण अधिकच वाढले. या वर्षी गंभीर रुग्णांचे वाढलेले हेच प्रमाण आता यंत्रणेसाठी वेगवेगळे धडे देऊन गेले आहे. एका रुग्णापासून दुसऱ्या रुग्णाला बाधा होऊ नये, म्हणून व्हेंटिलेटरचे ईटी ट्यूब व ह्युमिडीफायर हे प्रत्येकी सहा तासांनी स्वच्छ केले जात असल्याचे केलेल्या पाहणीत आढळून आले.

म्युकरमायकोसिसमुळे अधिक दक्षता

कोरोनानंतर सध्या म्युकरमायकोसिसचे रुग्ण समोर येत असल्याने, व्हेंटिलेटर अथवा इतर कोणत्याही कारणामुळे रुग्णांना भविष्यात संसर्ग होऊ नये, यासाठी व्हेंटिलेटरची अधिकच काळजी घेण्यावर भर वाढल्याचेही दिसून आले. म्युकरमायकोसिस नेमके व्हेंटिलेटरमुळे अथवा कशामुळे होतो, हे अजून समोर आले नसले, तरी दक्षता म्हणून यंत्रणा सज्ज आहे.

कोरोना स्थिती

एकूण रुग्ण १,३९,३३१

बरे झालेले रुग्ण १,३०,२७६

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण ६,५३९

दुसऱ्या लाटेतील रुग्ण - ७९,१८८

दुसऱ्या लाटेतील किती मृत्यू- १,०८३

जीएमसीमध्ये ऑक्सिजन नर्स : ०४

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात व्हेंटिलेटरची दक्षता घेण्यासाठी ऑक्सिजन नर्स व ऑक्सिजन तंत्रज्ञ यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. या रुग्णालयात १२७ व्हेंटिलेटर असून, त्यांच्या स्वच्छतेसाठी २४ तासांतून चार वेळा पाहणी केली जाते व त्यांची स्वच्छता केली जाते. यामध्ये जेवढे व्हेंटिलेटर आहेत, त्यापेक्षा अधिक ह्युमिडीफायर स्टँड बाय म्हणून उपलब्ध आहे. त्यामुळे ते काढले की स्वच्छ केलेले ह्युमिडीफायर त्या ठिकाणी लावले जाते. याविषयी दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनीही व्हेंटिलेटरविषयी काळजी घेतली जात घेतली जात असल्याचे सांगितले.

पुरेशा मनुष्यबळामुळे स्वच्छतेची चिंता नाही

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या व्यतिरिक्त डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. या ठिकाणी ४० व्हेंटिलेटर असून, तेथेही कर्मचार्‍यांतर्फे दिवसातून तीन वेळा ते स्वच्छ केले जातात. अर्थात, प्रत्येक सहा तासांनी ते स्वच्छ करण्याच्या सूचना असून, त्यांचे पालन कर्मचारी करीत असल्याचे दिसून आले. या ठिकाणी ४०० बेड असून, सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने ७० रुग्णांवर उपचार सुरू आहे. अनेक बेड व व्हेंटिलेटरही रिक्त असून, तसेच मनुष्यबळही पुरेसे असल्याने रुग्णसंख्या अधिक असो की, कमी प्रत्येक वेळी व्हेंटिलेटरवर अधिक लक्ष दिले जात असल्याचे सांगण्यात आले.

महिला रुग्णालयातही व्हेंटिलेटरची सुविधा

मोहाडी रस्त्यावरील १०० खाटांच्या महिला रुग्णालयांमध्ये तातडीने कोरोना रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या ठिकाणीही व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आवश्यकता नसल्याने सध्या ते सुरू करण्यात आलेले नाहीत.

प्रत्येक सहा तासांनी स्वच्छता आवश्यक

व्हेंटिलेटर रुग्णांसाठी जीवदान आहे. त्या पद्धतीने मात्र त्याची स्वच्छताही होणे गरजेचे आहे. यामध्ये व्हेंटिलेटरचे ईटी ट्यूब व ह्युमिडीफायर हे प्रत्येक सहा तासांनी स्वच्छ करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास इन्फेक्शनचा धोका वाढतो. त्यामुळे व्हेंटिलेटरची अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे, असा सल्ला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांनी दिला.

----------------------

व्हेंटिलेटर हे रुग्णांसाठी जीवदान ठरत असले, तरी त्याची काळजी महत्त्वाची आहे. यासाठी आमच्याकडे ऑक्सिजन नर्स व ऑक्सिजन तंत्रज्ञ नियुक्त करण्यात आले आहे. ते व्हेंटिलेटरची अधिक काळजी घेतात. प्रत्येक सहा तासांनी व्हेंटिलेटरची स्वच्छता केली जाते.

- डॉ.जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय

रुग्णालयात येणाऱ्या गंभीर रुग्णाला ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची आवश्यकता पडल्यास, त्याच्यासाठी ते तत्काळ उपलब्ध करून दिली जातात. विशेष म्हणजे, त्यांची स्वच्छताही करण्यावर आमचा भर असतो‌. २४ तासांत चार वेळा व्हेंटिलेटरचे ईटी ट्यूब व ह्युमिडीफायर स्वच्छ केले जातात.

- डॉ.एन.एस. आर्वीकर, अधिष्ठाता, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय

Web Title: The increasing severity also increased the vigilance about the ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.