जळगावात वाढते तापमान, इसमाचा उष्माघाताने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:52 PM2018-04-29T12:52:12+5:302018-04-29T12:52:12+5:30
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २९ - पाचोरा तालुक्यातील आसनगाव येथून लग्न समारंभाहून परत येत असताना गजानन केशव टेंभुर्णे (५०, रा. जलाराम नगर) यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी कंझरवाडा परिसरात घडली. दरम्यान, उष्माघात आहे की काय हे आताच सांगता येत नाही मात्र टेंभुर्णे यांच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. धीरज महाजन यांनी सांगितले.
शहरातील जलाराम नगर येथील रहिवासी गजानन केशव टेंभुर्णे हे सकाळी दुचाकीने जळगाव येथून पाचोरा तालुक्यातील आसनगाव येथे लग्नसमारंभासाठी गेले होते. दुपारी जळगावकडे येत असताना अचानकपणे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते कंजरवाडा समोरील वखारीजवळ थांबले. त्याचठिकाणी ते खाली कोसळून त्यांना उलटी झाली व ते बेशुद्ध पडले. त्या वेळी परिसरातील दोन युवकांनी त्यांच्या पत्नीला त्यांच्याच या बाबत माहिती दिली. काही वेळातच त्यांची पत्नी कल्पना टेंभुर्णे त्याठिकाणी पोहचल्या. तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झवर हेदेखील त्याठिकाणी पोहचले व मदत कार्य करीत टेंभुर्णे यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र वैद्यकिय अधिकारी डॉ. धीरज महाजन यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मयत घोषीत केले.
जिल्हा रुग्णालयात आक्रोश
जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गजानन टेंभुर्णे यांना मयत घोषीत करताच त्यांची पत्नी कल्पना टेंभुर्णे यांनी आक्रोश केला. यावेळी नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती.
उष्णतेची लहर
तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. त्यामुळे अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. येत्या दोन ते तीन दिवसात उष्णतेची लहर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.