शस्त्रांपेक्षा मानवी जीवनशैलीने अधिक हिंसा - सोनम वांगचूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:38 PM2018-10-02T12:38:27+5:302018-10-02T13:04:49+5:30
जळगाव येथे गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन
जळगाव : जी जीव सृष्टी तयार व्हायला करोडो वर्षे लागली त्याच जीवसृष्टतील ५२ टक्के वन्यजीव, किडे आपण केवळ ४० ते ५० वर्षात नष्ट केले आहे. आज जनजागृतीमुळे शस्त्रांपासून होणारी हिंसा कमी झाली असली तरी शस्त्रापेक्षा मानवी जीवनशैलीमुळे हिंसा वाढली असून महात्मा गांधी यांच्या विचारांची तसेच अहिंसक जीवनशैलीची आज खरी गरज आहे, असे स्पष्ट मत रॅमन मॅगेसेसे पुरस्कार प्राप्त सोनम वांगचूक यांनी व्यक्त केले. दरम्यान, तत्पूर्वी काढण्यात आलेल्या अहिंसा सद्भावना शांती यात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.
महात्मा गांधी यांची १५०वी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या ११४ व्या जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे २ आॅक्टोबर रोजी अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर महात्मा गांधी उद्यानात सभा झाली. त्या वेळी सोनम वांगचूक बोलत होते.
या वेळी वांगचूक यांच्यासह महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, महापौर सीमा भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्तापकीय संचालक अनिल जैन, ज्योती जैन, संघपती दलूभाऊ जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. सुदर्शन आयंगार, सोनम गांधी उपस्थित होते.
सकाळी मनपा इमारतपासून अहिंसा सद्भावना शांती यात्रेस सुरुवात होऊन ती नेहरू चौक, छत्रपती शिवाजी पुतळा, जिल्हा क्रीडा संकुल, बससस्थानकामार्गे महात्मा गांधी उद्यानात पोहचली व तेथे सभेत रुपांतर होईल.
१५० गावांमध्ये विविध उपक्रम
महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त ९ राज्यातील १५० गावांमध्ये शेती, पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगार या पाच गोष्टींसाठी काम करण्यात येणार असल्याची घोषणा या वेळी अनिल जैन यांनी केली.
चित्रशिल्पातील बापू प्रदर्शन
जैन इरिगेशनचे सहकारी आर्टिस्ट आनंद पाटील यांनी ‘चित्र-शिल्पातील बापू’ हे वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनदेखील आयोजित केले आहे. महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांच्याहस्ते त्याचे उद््घाटन झाले. हे प्रदर्शन २ ते ४ आॅक्टोबर दरम्यान महात्मा गांधी उद्यानाच्या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.