जळगावात कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण, ८५० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 09:35 PM2024-03-05T21:35:13+5:302024-03-05T21:35:33+5:30
संपामध्ये जिल्हाभरातील ८५० कंत्राटी कामगार सहभागी झाले आहे.
जळगाव : तीस टक्के पगार वाढ, कंत्राटदार कर्मचाऱ्यांना शाश्वत रोजगार तसेच नियमित सेवेत सामावून घेण्यासह विविध १६ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संघर्ष कृती समितीने महावितरणच्या कंत्राटी कामगारांनी बेमुदत संप मंगळवार दि. ५ पासून पुकारला आहे. या बेमुदत संपामध्ये जिल्हाभरातील ८५० कंत्राटी कामगार सहभागी झाले आहे.
महावितरणच्या वीज मंडळाच्या कंत्राटी कामगार संघटनेतर्फे १६ विविध प्रकारच्या मागण्यांबाबत यापूर्वी पाच टप्यात आंदोलन करण्यात आले. सहाव्या टप्याचे आंदोलन मंगळवार पासून राज्यभरात सुरू झाले आहे. जळगाव महावितरणच्या सर्कल कार्यालयाच्या प्रवेशद्वार समोर मंगळवारी सकाळी सहावा टप्पाचे आंदोलनाला सुरूवात झाली. या आंदोलनात कंत्राटी कामगारांनी सहभाग घेत बेमुदत संप पुकारला आहे. यावेळी कंत्राटी कामगार संघर्ष कृती समितीतील सदस्य खलीलोद्दीन शेख, प्रमोद ठाकूर, दिलीप शास्त्री, किरण पाटील, विजय वराडे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कर्मचारी संपात सहभाग घेतलेला आहे.
महावितरण म्हणते, थोडेच कर्मचारी संपात
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाने महावितरणच्या कामकाजावर काही परिणाम पडला याबाबत महावितरण अधिकारी अधीक्षक अभियंता अनिल महाजन यांनी संपाचा कामकाजावर काही परिणाम झालेला नसल्याचे सांगितले. संपात थोडेच कर्मचारी सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. तर कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी संपात सहभागी असल्याचा दावा केला.