भारत मातेच्या जयजयकारात मिळाली शाळेमध्ये मिठाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 01:08 AM2018-08-15T01:08:55+5:302018-08-15T01:12:45+5:30
स्वातंत्र्य दिन विशेष : ८५ वर्षीय शिवाजी मराठे यांनी दिला आठवणींना उजाळा
जिजाबराव वाघ
चाळीसगाव, जि.जळगाव : ‘आम्ही मुले त्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत आलो. दुसरीत होतो मी. तो दिवस होता, १५ आॅगस्ट १९४७ चा. शाळेत मंगलवाद्ये निनादत होती. रंगीबेरंगी पताकाही लावण्यात आल्या होत्या. आम्ही मुले कुतुहलाने हे सर्व पाहत होतो. गुरुजींनी घोषणा दिली. 'भारत माता की जय, वंदे मातरम...! नंतर तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. आम्हाला मिठाई मिळाली...’ स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ८५ वर्षीय स्वातंत्र्य सैनिक शिवाजी रंगनाथ मराठे यांना स्वातंत्र्याच्या मंतरलेल्या आठवणी जागविताना गहिवरुन आले होते.
शिवाजी मराठे यांनी १९५५ मध्ये झालेल्या गोवा मुक्तिसंग्राम आंदोलनातही सहभाग घेतला आहे. ७२ वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाले त्यावर्षी १९४७ मध्ये ते इयत्ता दुसरीत होते. त्यांचं वय होत १३ वर्षे. पंचायत समिती कार्यालयाजवळ पालिकेची क्रमांक तीन ही त्यांची शाळा.
भाषणे रेडिओवर ऐकायचो
स्वातंत्र्य दिनाच्या आठवणींचा जागर करताना ते म्हणाले, ‘मी लहान होतो. फारसं काही समजतही नव्हतं. वडिलांची शिस्त फारच कडक होती. अधून-मधून मोठ्या माणसांच्या गप्पांमध्ये स्वातंत्र्य - पारतंत्र्य असे शब्द ऐकायला मिळायचे.
महात्मा गांधी, पंडित नेहरू यांची भाषणे रेडिओवरून ऐकली जायची. रेडिओवरील भाषण ऐकण्यासाठीही गर्दी व्हायची.' १५ आॅगस्ट १९४७ ची आठवण सांगताना त्यांचा ऊर भरून आले. ते म्हणाले, 'तो दिवस अजूनही स्मरणात असून त्यादिवशी भारत स्वतंत्र झाला म्हणून मिळालेल्या मिठाईची चव अजूनही जिभेवर रेंगाळली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ती कायम राहील...'
स्वार्थ बळावतो आहे
सद्य:स्थितीबाबत ते व्यथित होऊन म्हणाले, 'युवा पिढी चंगळवादाच्या मागे धावते आहे. स्वार्थ बळावले आहे. राज्यकर्त्यांमध्ये दूरदृष्टीचा अभाव आहे. ही लोकशाही व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे. देशप्रेमाची ज्योत ही प्रत्येकाच्या मनात कायम तेवत रहावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आंदोलनात सहभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
शिवाजी मराठे यांनी १९५५ मध्ये गोवा मुक्तिसंग्राम आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्याकाळी १५ दिवस ते गोव्यात होते. २०१७ मध्ये १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनाच्या अमृत महोत्सवाच्या स्फूर्तिदायी पर्वणीवर शिवाजी मराठे यांचा इतर स्वातंत्र्य सैनिकांसोबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, तत्कालिन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात यथोचित गौरव करण्यात आला आहे.