अपक्ष उमेदवार ज्योती महाजन यांच्या पतींनी घेतली राज्यमंत्र्यांची भेट
By admin | Published: February 28, 2017 12:10 AM2017-02-28T00:10:37+5:302017-02-28T00:10:37+5:30
उत्सुकता : शिवसेनेत उपसभापतीपदासाठी लॉबींग
जळगाव : आसोदा गणातील अपक्ष निवडून आलेल्या ज्योती महाजन यांचे पती तुषार महाजन यांनी नुकतीच सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची पाळधी येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
तुषार महाजन हे शिवसेना समर्थक आहे. त्यांना आसोदा गणातून सेनेतर्फे उमेदवारी हवी होती, पण त्यांचा विचार झाला नाही. त्यामुळे तुषार महाजन यांनी पत्नी ज्योती महाजन यांना अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले.
त्यात त्या विजयी झाल्या आहे. विजयानंतर तुषार महाजन यांनी राज्यमंत्र्यांची भेट घेतली.
राज्यमंत्री पाटील व महाजन यांच्यातील चर्चेचा तपशील मात्र समोर आलेला नाही. सदस्यांमध्ये याबाबत उत्सुकता आहे.
सेनेला उपसभापतीपद
पं.स.मध्ये तीन भाजपा, दोन अपक्ष व पाच सेनेचे सदस्य निवडून आले आहेत. बहुमतासाठी एक सदस्याची गरज आहे. त्यात कोण कुणाच्या बाजूने जातो हा मुद्दा आहे. याच पार्श्वभूमीवर तुषार महाजन यांनी गुलाबराव यांची भेट घेतल्याने शिवसेनेचे बळ वाढेल, असा मुद्दा चर्चिला जात आहे.
सभापती भाजपाचा
पं.स.मध्ये सभापतीपद हे अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे. या प्रवर्गातून फक्त भाजपाच्या यमुना रोटे या नशिराबाद गणातून निवडून आल्या आहे. त्यामुळे यमुना रोटे या सभापती झाल्याचे निश्चित आहे, पण उपसभापतीपदी कुणाची वर्णी लागेल याबाबत उत्सुकता आहे. उपसभापती शिवसेनेचा होणार आहे. त्यासाठी ज्योती महाजन, ललिता जनार्दन पाटील आदी नावे चर्चेत आहेत.